Sat, May 30, 2020 04:00होमपेज › Pune › ‘ओखी’ चक्रीवादळाचा राज्याला धोका नाही

‘ओखी’ चक्रीवादळाचा राज्याला धोका नाही

Published On: Dec 06 2017 1:42AM | Last Updated: Dec 06 2017 1:20AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

ओखी चक्रीवादळाचा राज्याला असणारा धोका आता टळला असून, या चक्रीवादळाने आता दक्षिण गुजरातकडे आपला मोर्चा वळविला आहे. राज्याच्या किनारी भागाच्या अत्यंत जवळ हे चक्रीवादळ असल्याने त्या सोबत बाष्पयुक्त ढग घेऊन ते आले. यामुळेच गेल्या 2-3 दिवसांपासून कोकण, मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज बुधवारी कोकणसह मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज असून, उद्यापासून ढगाळ वातावरण हळूहळू निवळायला सुरुवात होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. 

पुढील 3-4 दिवस दक्षिण गुजरात, पश्‍चिम गुजरात किनारपट्टी भागात वादळी वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. ओखी चक्रीवादळामुळे अरबी समुद्रातून पूर्वेकडे अतिउष्ण वारे वाहत असल्याने थंडी गायब झाली आहे. यामुळे कमाल व किमान तापमानातही वाढ झाली आहे. आर्द्रतेतही प्रचंड वाढ झाल्याने नागरिक ऐन थंडीत घामाघूम होत आहेत. आता मात्र ही स्थिती बदलणार असून मंगळवारनंतर बहुतांश भागांत आकाश निरभ्र होऊन थंडीचे पुनरागमन होईल, असे ते म्हणाले.