होमपेज › Pune › उच्चभ्रूंमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण

उच्चभ्रूंमध्ये आत्महत्येचे वाढते प्रमाण

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:42AMपुणे : अक्षय फाटक

उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही... कामासोबतच दैनंदिन जीवनातील प्रचंड ताण-तणाव... एकतर्फी प्रेम प्रकरण अन् प्रेमभंग... अवास्तव अपेक्षा आणि त्याची पूर्तता न होणे यासह अन्य कारणांंमुळे आयटी क्षेत्रात कार्यरत असणारे तसेच उच्चभ्रू कुटुंबातील नागरिक जीवन संपवत असल्याच्या अनेक दुर्दैवी घटना शहरामध्ये घडत आहेत. गेल्या वर्षभरात आयटी क्षेत्र व अन्य ठिकाणी मोठ्या हुद्यांवर नोकरी करणार्‍या 20 ते 22 जणांनी मृत्यूला जवळ केेले आहे. कॉर्पोरेट कल्चरमधील सर्व सुविधांसोबतच गल्लेलठ्ठ वेतन घेणारे उच्च शिक्षित तरुण-तरुणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, हे जास्त धक्कादायक म्हणावे लागेल.   पुण्यासारख्या महानगरात अशा घटनांचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण समाजाची चिंता वाढवत आहे. 

शहरात केवळ पंधरा दिवसांमध्ये आत्महत्येच्या तीन घटना घडल्या आहेत. या तीनही घटनांमध्ये उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू नागरिकांचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेणार्‍या तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तर, बाणेर परिसरात एका आयटी इंजिनिअर पती व पत्नीने नैराश्यातून जीवन संपविले. आजारी मुलाचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून या दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यातच सोमवारी (दि. 29) मुंढवा परिसरात कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणीने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली. घरगुती वादातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 

अवघ्या 15 दिवसांमध्ये घडलेल्या या तीनही घटना मन सुन्न करणार्‍या आहेत. गल्लेलठ्ठ पगारामुळे मुबलक पैसा, उच्च राहणीमान व सर्व सुखसुविधा असतानाही उच्चभ्रू कुटुंबामधील नागरिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, हे समाजातील जळजळीत वास्तव आहे. ताण-तणाव आणि अवास्तव अपेक्षांची पूर्ती न झाल्याने अशा घटना वाढत असल्याने पोलिस दलातील जाणकारांचे निरीक्षण आहे. 
गेल्या वर्षभरात आयटी क्षेत्र तसेच खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर नोकरी करणार्‍या 20 ते 22 जणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे जीवन संपवले आहे. 
 

उच्च शिक्षीत आणि मोठ्या पदावर नोकरी  करणार्‍यांमध्ये क्षुल्लक आणि तत्कालीक कारणांमुळे आत्महत्येचे  पाऊल उचलले जात आहे. राज्यात गेल्या वर्षभरात (2017) तब्बल 17 हजारांवर आत्महत्येंच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहेत. 

एकलकोंडेपणा ठरतेय कारण

दैनंदिन जीवनातील वाढत असलेला एकलकोंडेपणा आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. कामांच्या ठिकाणच्या अडी-अडचणी आपला सहकारी किंवा कुटुंबातील सदस्यांशी शेअर करणे आवश्यक आहे.  तसेच आपला सहकारी नैराश्यात असल्याचे जाणवल्यास त्याच्याशी मन-मोकळे बोलून त्यांची अडचण जाणून घ्यावी व  त्याला यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत.  एखाद्या घटनेत आत्महत्या करणे हे तत्कालीक कारणही असू असते. परंतु, काही घटनामध्ये अनेक दिवसांपासून नैराश्यात आढळत असलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करून त्यांच्या मनात सत्कारात्मक विचार रुजवणे आवश्यक असते.