Wed, Nov 21, 2018 12:05होमपेज › Pune › आता मोबाईलवरून नोंदवता येणार तक्रार 

आता मोबाईलवरून नोंदवता येणार तक्रार 

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:22AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

राज्यातील नागरिकांना पोलिस ठाण्यात न जाता एका क्लिकवर मोबाईलवरून ई-तक्रार देता येणार आहे. त्यासाठी राज्य पोलिस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या  महाराष्ट्र पोलिस सिटिझन पोर्टल अ‍ॅप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे 22 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आले. त्या वेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजयकुमार व संजीवकुमार सिंघल हे उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींचा अभ्यास करून गुन्हे अन्वेेषण विभागाने वर्षभर त्यावर काम करून हे अ‍ॅप तयार केले. त्याची वेळोवेळी पडताळणी राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये केली. त्यानंतर सिटिझन पोर्टल अ‍ॅप नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. अ‍ॅप तयार करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक संजयकुमार व संजीवकुमार सिंघल प्रयत्नशील होते.  महाराष्ट्र पोलिस सिटिझन पोर्टल अ‍ॅप अँड्रॉईड तसेच आयओएस प्रणालीवर मराठी तसेच इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. अ‍ॅपवर नागरिकांना चोवीस सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच तक्रारदाराला त्याच्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची इत्थंभूत माहिती मिळणार आहे.     या अ‍ॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर नागरिकांना तक्रार करता येणार आहे. तक्रार केल्यावर नागरिक पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त यांच्या कार्यालयात ई-तक्रार देऊ शकतात. तक्रार दाखल झाल्यावर तक्रारदाराला एसएमएस; तसेच ई-मेलद्वारे पोच प्राप्त होईल. त्यात तक्रारीचा क्रमांक, तसेच तक्रार कोणत्या पोलिस ठाण्यात किंवा वरिष्ठ कार्यालयात देण्यास आली याची माहिती देण्यात येईल. तक्रारीमध्ये दखलपात्र गुन्ह्याचे स्वरूप दिसून आल्यास प्रभारी अधिकारी व तक्रारदाराला याची माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त या अ‍ॅपचा वापर करण्याचे आवाहन राज्य पोलिस दलाने केले आहे.