Fri, Aug 23, 2019 14:27होमपेज › Pune › सात-बारा ऑनलाईनचा मुहूर्त पुन्हा हुकणार

सात-बारा ऑनलाईनचा मुहूर्त पुन्हा हुकणार

Published On: Mar 17 2018 1:14AM | Last Updated: Mar 17 2018 12:05AMपुणे : समीर सय्यद 

राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने अचूक संगणकीकृत 7-12 आणि 8-अ उतारा शेतकर्‍यांना मिळावा यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आली असून, आता 31 मार्चपर्यंत राज्यातील संपूर्ण गावांतील सात-बारा ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट  देण्यात आले आहे. मात्र, त्याला पुणे जिल्हा अपवाद ठरणार असून, जिल्ह्यातील एकूण 1911 गावांपैकी 913 गावांतील सात-बारा अचूक संगणकीकृत झाला आहे. शिल्लक असलेली गावे ही मुदतीत पूर्ण होणार नाहीत; त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण सात-बारा ऑनलाईचा मुहूर्त हुकणार असल्याचे स्पष्ट आहे.

शेतकर्‍यांना तलाठी हस्तलिखित सात-बारा देत होता; मात्र त्यामध्ये अनेक चुका  असल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर 2002 पासून राज्यात 7-12 संगणकीकृत करण्यात आले; परंतु त्यातही चुका आढळून येत होत्या; तसेच नोंदी ऑनलार्ईन करण्यासाठी केंद्रपुरस्कृत डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राज्यात कार्यान्वित करण्यात आला. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसित केली आहे. त्याअधारे राज्यात ई-फेरफार केले जात आहेत. राज्यातील संबंधित महसूल यंत्रणेला सात-बाराचा सर्व्हे नंबर योग्य प्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत सात-बारा व आठ-अ उतार्‍यासाठी तब्बल 24 मुद्द्यांवर तपासणी केली जात आहे. राज्यातील बुहुतांश गावांतील सात-बारा ऑनलाईन पूर्ण झाले आहेत; मात्र, सात-बारांची संख्या जास्त असलेली गावांतील सात-बारा ऑनलाईन होण्यास वेळ लागत आहे. आतापर्यंत प्रकल्पाला चार ते पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.  राज्याच्या इतर काही जिल्ह्यांपेक्षा तीन ते चार पट सात-बारा आणि खातेदारांची संख्या पुणे जिल्ह्यात जास्त आहे.

जिल्ह्यात 1911 महसुली गावे असून, त्यापैकी 913 गावांतील सात-बारा ऑनलाईन झाले आहेत. 1289 गावांत खाते प्रोसेसिंग पूर्ण  झाली आहे; तर 950 गावांमध्ये रि-एडिटिंगचे काम करण्यात आले आहे. वेल्हे तालुक्यात 71 टक्के गावांतील सात-बारा ऑनलाईन झाले आहेत. इंदापूर 63 टक्के, मावळ 55 टक्के, दौंड 60 टक्के, बारामती तालुक्यातील 59 टक्के गावांत सात-बारा ऑनलाईन मिळणार आहेत. पुणे जिल्ह्यात 14 लाख 34 हजार 382 सात-बारा खातेदार असून, त्यापैकी 14 लाख 45 हजार 567 सात-बारांची दुरुस्ती करण्यात आली. 48 हजार 815 सात-बारांच्या दुरुस्तीचे काम शिल्लक आहे. त्यातील 25 हजारांपेक्षा अधिक सात-बारा हे हवेली तालुक्यातील आहेत.

लोकल सर्व्हरचा वापर
सात-बारा ऑनलाईन करण्याचे काम ज्या सर्व्हरवर केले जाते त्यावर कामाचा ताण वाढल्यामुळे अनेक सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने काम रखडते; त्यामुळे याचा परिणाम कामकाजावर होतो. कामाला गती मिळावी म्हणून हवेली तालुक्यात स्थानिक सर्व्हरचा वापर बुधवारपासून केला जात आहे. यामुळे कामाला गती मिळेल, असा विश्‍वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

पुणे जिल्ह्यात खातेदारांची संख्या मोठी असून, त्यात चुक असण्याची संख्याही अधिक आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये बिनचूक सात-बारा शेतकर्‍यांना मिळावा म्हणून काम युद्धपातळीवर सुरू आहे. 31 मार्चपर्यंत संपूर्ण गावांतील सात-बारा ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेे; मात्र मुदतीत पुणे जिल्ह्यातील 1550 गावांतील सात-बारा ऑनलाईन होण्याचे नियोजन आहे. बिनचूक काम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी, पुणे