पिंपरी : प्रतिनिधी
शहरातील पिंपरी येथे एका ३६ वर्षीय तरूणाचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला. या तरूणाला अनैतिक संबंधामधून मारहाण करुन हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.
कैलास तौर (रा. समर्थनगर, सांगवी, मुळ बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. कैलास यांचे लग्न झालेले असून त्यांना एक मुलगा आहे. दोन दिवसांपूर्वीच तौर आपली पत्नी व मुलाला बीडला सोडून आले होते. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कैलास यांचा मृतदेह ते राहत असलेल्या घरातल्या बाथरुममध्ये आढळून आला. कैलास यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौर यांचा मृतदेह राहत्या घरातल्या बाथरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. सोमवारी सकाळी एक कामगार तौर यांच्या घरी आला होता. त्याला तौर जखमी अवस्थेत घरात असल्याची समजल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली. सांगवी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केला.
पोलिसांना कामगारावर संशय आल्याने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान कामगाराने दिलेल्या माहितीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत आहे. अधिक चौकशीमध्ये संशयीत कामगाराच्या पत्नीचे व कैलास तौर यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. अधिक तपास सांगवी पोलिस करत आहेत.