Mon, Aug 19, 2019 17:31होमपेज › Pune › परंपरेची मूळ रोवून धरण्यास शासनानेही पाठीशी उभे राहावे : कीर्ती शिलेदार (Video)

परंपरेची मूळ रोवून धरण्यास शासनानेही पाठीशी उभे राहावे : कीर्ती शिलेदार (Video)

Published On: Apr 20 2018 4:02PM | Last Updated: Apr 20 2018 4:02PMपुणे : प्रतिनिधी

आज जग वेगवान झाले आहे. त्यावर पाश्‍चिमात्य करमणुकीचा ठसा  जनमानसावर झटक्यात पसरत चालला आहे. यामध्ये आपल्या परंपरेची मूळ रोवून घट्ट धरण हे कलाकारांचे आणि रसिकांचे काम आहे. त्याप्रमाणेच शासनानेही या प्रयत्नांच्या पाठीशी सबळपणे उभे राहिले पाहिजे, ही आशा मी व्यक्त करते, असे मत नवनिर्वाचित नाट्य संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले.

दै. पुढारीचे प्रतिनिधी केतन पळसकर यांच्याशी संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी विशेष बातचीत केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबई येथे 13 ते 15 जून यादरम्यान होणार्‍या 98 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी त्यांचे नाव गुरूवारी जाहीर झाले. अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या संमेलनाध्यक्षपदासाठी कीर्ती शिलेदार यांच्यासह सुरेश साखवळकर आणि श्रीनिवास भणगे यांचे अर्ज अखिल भारतीय नाट्य परिषदेकडे प्राप्त झाले होते.

कीर्ती शिलेदार म्हणाल्या, आयुष्यातील दिवस संगीत रंगभूमीवर घालवले. पन्नास वर्षाची कारकीर्द रंगभूमीवर मी घालवली आणि आई-वडिलांचा वारसा जपून ठेवला आहे. नव-नवीन प्रयोग करीत तो वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवित आहे. संगीत नाटक ही महाराष्ट्राची अलौकिक परंपरा आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून मला संगीत रंगभूमीबद्दल अधिक जनजागृती करता येईल. त्यामुळे संमेलनाध्यक्षपद मिळाल्याचा आनंद वाटतो. माझ्या आईनेसुद्धा हे पद भूषविले होते आणि त्यानंतर मला सुद्धा हे पद भूषवायला मिळते आहे; त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

कीर्ती शिलेदार म्हणाल्या, नवनवीन बदल रंगभूमीवर आवश्यक आहेत. मात्र, त्याबरोबरच संगीत नाटकाचा जो आत्मा आहे त्याची जपणूक व्हावी. आपल्या भारतीय परंपरेतील कलेमध्ये विविध वाद्ये आहेत. या विविध कलांमध्ये त्या वाद्यांचा वापर केला जातो. वारकर्‍यांचे अभंग-भजनांमध्ये टाळ मृदुंगाचा निनाद आहे. त्याचा वापर केला जावा. आपण लोककलेमध्ये संमृद्ध आहोत त्यातील संगीत रंगभूमीवर याव, ज्यामध्ये प्रत्यक्ष संगीत आहे त्या संगीताचा उपयोग रंगभूमीकरिता केला जावा. इलेक्ट्रीसिटीवर अवलंबून असणारे इंग्लिश वाद्ये सहजासहजी उपलब्ध होतात. मात्र, चर्मवाद्य, तंतुवाद्य हे आपल्या वातावरणाशी अनुकूल आहेत. त्याचा उपयोग करून नवीन काही घडविल्यास ते खूप स्वागतार्ह आहे. असे नव-नवीन प्रयोग तरूण पिढीने करावे. त्यामधून एक नवसंगीत नाटक अधिक चांगल्या रितीने सादर व्हाव, अशी मी इच्छा व्यक्त करते, असेही त्या म्हणाल्या.