Wed, Apr 24, 2019 01:44होमपेज › Pune › कारवाई टाळण्यासाठी स्वत:वर ब्लेडने वार

कारवाई टाळण्यासाठी स्वत:वर ब्लेडने वार

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 2:08AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या प्रकरणात पोलिसांनी पकडल्यावर वाहनचालक तरुणाने कारवाई टाळण्यासाठी खिशातील ब्लेडने स्वत:च्या अंगावर वार करून दुखापत करून घेत सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात घडली. पोलिसांनी तरुणाला अटक केली. सागर बाबू शेंडगे (22, माळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलिस हवालदार अनिल म्हस्के यांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस हवालदार अनिल म्हस्के हे बुधवारी रात्री हडपसर येथील मंत्री मार्केट परिसरात वाहनचालकांची तपासणी करत होते. त्यावेळी अटक करण्यात आलेला सागर शेंडगे हा त्याचे वाहन तेथे घेऊन आला. त्याला फिर्यादी यांनी  वाहन बाजूला घेण्यास सांगून त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याने मद्य प्राशन केल्याचे आढळून आले. पोलिसांकडून कारवाई टाळण्यासाठी त्याने खिशातील ब्लेड काढून स्वत:च्या डाव्या हातावर व छातीवर वार करून दुखापत करून घेतली. त्यानंतर त्याला सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक माळी यांनी दिली.