Fri, May 29, 2020 00:35होमपेज › Pune › विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत होणार संग्रहालय

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत होणार संग्रहालय

Published On: Dec 16 2017 2:20AM | Last Updated: Dec 16 2017 2:11AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘हेरिटेज’ मुख्य इमारतीमध्ये लवकरच पुरातन वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या स्थावर विभागापासून मुख्य इमारतीपर्यंत येणार्‍या ब्रिटीशकालीन भुयारामधून विद्यार्थी आणि नागरिकांना या संग्रहालयात येता येणार आहे. या संग्रहालयात विद्यापीठाच्या विविध विभागांमधील अतिप्राचिन वस्तू, दस्ताऐवज, शिल्पे, कागदपत्रे, संशोधन, विषयांवर अभ्यासपूर्ण माहितीफलक आणि ऐतिहासिक वास्तू पाहता येणार आहेत. मुख्य इमारतीच्या दोन दालनांमध्ये लवरकर हे संग्रहालय आकाराला येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे.

विद्यापीठास भेट देणार्‍या विद्यार्थी, नागरिक, तज्ज्ञ, राजकीय नेते यांचा नेहमीच राबता असतो. या सर्वांनाच विद्यापीठातील ऐतिहासिक वस्तू पाहता याव्यात, यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्येच संग्रहालय उभारण्याची तयारी विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यासाठी जाणकार तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला हेरिटेजचा दर्जा प्राप्त आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये शैक्षणिक आणि इतर कामांसाठी फारसा बदल करता येत नाही. या इमारतीचे नूतनीकरण काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याने इमारतीला झळाळी मिळाली आहे. सध्या या इमारतीमध्ये कुलगुरू कार्यालय, एक मोठे सभागृह, दोन दालने असून इमारतीतील मोठा भाग रिकामा आहे. या रिकाम्या भागाचा वापर संग्रहालय करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा विचार सुरू असून त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.

त्यानुसार डॉ. करमळकर यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र लिहून विभागात असणार्‍या पुरातन वस्तू आणि गोष्टींची माहिती देण्याबाबत आवाहन केले होते. त्याला विभागप्रमुखांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विद्यापीठाला ऐतिहासिक दर्जा आहे. या दर्जात आणखी भर घालण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात येत आहे. संग्रहालय उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी संग्रहालयाच्या उभारणीसंदर्भातील उत्तम जाण असणार्‍या समितीतीलच एका व्यक्तीकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. संग्रहालय मुख्य इमारतीत असले तरी ते विद्यार्थी आणि नागरिकांना मोफत पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे ऐतिहासिक महत्व वाढणार आहे.