होमपेज › Pune › कोट्यवधीच्या भूखंडाचा आज मुख्यसभेत फैसला

कोट्यवधीच्या भूखंडाचा आज मुख्यसभेत फैसला

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या ताब्यात असलेली कोट्यवधी रुपये किमतीची जागा मूळ मालकाला देण्यासाठी काँग्रेस वगळता सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्ष एकवटले आहेत. त्यामुळे यासंबंधीच्या प्रस्तावावर आज सोमवारी मुख्यसभेत काय निर्णय घेतला जाणार, यासंबंधीची उत्सुकता निर्माण झाली आहे.  प्रस्ताव स्वीकारला जाणार की, पुणेकरांनी बहुमताने निवडून दिलेला सत्ताधारी भाजप हा प्रस्ताव फेटाळून पुणेकरांच्या विश्‍वासास पात्र ठरणार, हेही यानिमित्ताने स्पष्ट होणार आहे. 

पर्वती येथील 120 अ आणि 120 ब ही जागा पालिकेने 55 वर्षांपूर्वी ताब्यात घेतली आहे. मात्र, संबंधित जागा मालकाने पालिकेने दिलेला मोबदला नाकारला. जागा मालकांच्या मागणीनुसार तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी ही जागा परत देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. या निर्णयाविरोधात पालिकेने न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निर्णय दिला.  या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती जागा मालकाने न्यायालयाला केली असून, सद्य:स्थितीला हा दावा प्रलंबित आहे. 

दरम्यान, एकीकडे न्यायालयात दावा सुरू असतानाच, जागा मालकाने केलेल्या मागणी अर्जावरून ही जागा मूळ जागामालकाला परत देण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून राज्य सरकारकडे पाठविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी एकत्र येऊन गुपचुपरीत्या मंजूर केला. त्यानंतर शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी त्यावर फेरविचाराचा ठराव दिला; मात्र स्थायीमध्ये फेरविचाराचा ठराव आल्यावर सेनेने कोलांटउडी घेतल्याने तो मागे घ्यावा लागला. अखेर काँग्रेसच्या सदस्यांनी फेरविचाराचा ठराव दिला, त्यामुळे त्यावर आता प्रशासनाचा अभिप्राय घेण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. 

काँग्रेस वगळता सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हा भूखंड परत देण्यासाठी एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी स्थायी समितीत मान्य करण्यात आलेला हा प्रस्ताव  सर्वसाधारण सभेत दाखल झाला आहे. सोमवारी (दि.29)  होणार्‍या मुख्यसभेत हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करणारा आणि बेकायदा पद्धतीने मान्य करण्यात आलेला हा प्रस्ताव, मुख्य सभा मान्य करणार की फेटाळून लावणार,  याकडे नागरिकांचे आता लक्ष लागले आहे.