Sun, Sep 23, 2018 19:36होमपेज › Pune › राष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात 

राष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणेः प्रतिनिधी

महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेविकेने बांधकाम विभागातील एका अधिकाऱ्यास धमकावल्याचा प्रकार बुधवारी घडला. यावेळी नगरसेविकेच्या पतीने आणि कार्यकर्त्यांनी अधिकार्‍यास अरेरावी केली. तर एका कार्यकर्त्यांने या अधिकार्‍याच्या कार्यालयातील खुर्चीला लाथही मारली. या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक चक्क कमांडोच्या वेशात पालिका सभागृहात अवतरले. घडलेल्या प्रकाराचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली.

महापालिकेच्या बांधकाम विभागातील एका अधिकार्‍याकडे बुधवारी भाजपच्या एक नगरसेविका काही कामानिमित्त आल्या होत्या. यावेळी त्यांच्या समवेत पती आणि कार्यकर्ते होते. एका कामावरुन संबधित अधिकारी आणि नगरसेविका यांच्यामध्ये वाद झाला. त्यामुळे संबधित नगरसेविकेने या अधिकार्‍यास दमदाटी केली. तर नगरसेविकेच्या पतीने आणि कार्यकर्त्यांनी या अधिकार्‍यांला अरेरावी केली. यातील एका कार्यकर्त्यांने संबंधीत अधिकार्‍याच्या कार्यालयातील खुर्चीला लाथ मारली. यावेळी कार्यालयात मोठयाप्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. 

शहरातील एकात्मिक सायकल धोरण आणि सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य उपविधीस मान्यता देण्यासाठी गुरूवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. नगरसेविकेने अधिकाऱ्यास धमकावल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैय्या जाधव हे चक्क कमांडोच्या वेशात पालिका सभागृहात अवतरले. यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घडलेल्या प्रकाराचा खुलासा करण्याची मागणी केली. मात्र खुलासा न करताच ही सभा १४ डिसेंबरपर्यंत तहकुब करण्यात आली. 

दरम्यान, महापालिकेच्या विविध कामांच्या निविदेमधील रिंग तोडल्याच्या कारणाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीने ठेकेदाराला दमबाजी केल्याचे प्रकरण ताजे असताना, आणि रिंग प्रकरणावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झालेला असतानाच, आत्ता यासंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले, महापालिकेत कधी तोडफोड, लाथाबुक्क्याने मारहाण, खुर्च्यांची फेकाफेक, निविदांमध्ये रिंग तोडल्याबद्दल दमबाजी, असे अनेक प्रकार होत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना आता दोन कमांडो स्व-संरक्षणासाठी घेऊन फिरावे लागेल. सगळेच अधिकारी आयुक्तांसारखे जिममध्ये जात नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.