Tue, Mar 19, 2019 05:29होमपेज › Pune › शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालिकेकडून फक्त पुष्पहार

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालिकेकडून फक्त पुष्पहार

Published On: Feb 18 2018 2:01AM | Last Updated: Feb 18 2018 12:17AMपुणे : प्रतिनिधी

एका जनहित याचिकेच्या सुनावणीत महापालिकेच्या खर्चातून साजरे केले जाणारे, सण, उत्सव, तसेच महोत्सव बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त महापालिकेकडून महाराजांच्या पुतळ्यास आणि प्रतिमेस फक्त पुष्पहारच आर्पण केला जाणार आहे. जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा खर्च नगरसेवक, सार्वजनिक मंडळे आणि शैक्षणिक संस्थांकडून केला जाणार आहे. 

दरवर्षी पालिकेकडून शिवजंयती निमित्ताने शिक्षण मंडळाच्या मुलांच्या माध्यमातून चित्ररथ आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवास  मिरवणूकीत सहभागी होणार्‍या मंडळसाठी स्वागत कमान, स्वागत कक्ष उभारले जातात. या खर्चासाठी पालिकेच्या अंदाज पत्रकात तरतूदही केली जाते.  मात्र, यंदा पालिकेला अशा गोष्टींवर खर्च करता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, महापालिकांनी अशा प्रकारचे खर्च करू नये, असे आदेश राज्य शासनानेही दिलेले आहेत. 

मागील आठवडयात राज्यशासनाने या निर्णयाबाबत दिलेल्या अभिप्रायात न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सत्ताधारी भाजपने हा खर्च न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शिवजयंतीच्या कार्यक्रमात खंड पडू नये म्हणून हा खर्च उचलण्याची जबाबदारी भाजप नगरसेवकांनी घेतली असून शहरातील सार्वजनिक मंडळे आणि शैक्षणिक संस्थाही आर्थिक हातभार लावणार आहे. 

दरम्यान, सत्ताधारी भाजपने शिवजयंतीच्या नियोजनाची जबाबदारी नगरसेवक हेमंत रासणे यांच्याकडे दिली आहे. यंदाही दरवर्षी प्रमाणे शिवजयंती साजरी केली जाईल. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत हा खर्च महापालिकेकडून न करता, नगरसेवक, सार्वजनिक मंडळे तसेच शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यासाठी नियोजन पूर्ण झालेले आहे, अशी माहिती रासणे यांनी दिली आहे.