Fri, Mar 22, 2019 22:37होमपेज › Pune › गटबाजी रोखण्यासाठी सत्ताधार्‍यांवर ‘व्हिप‘ची नामुष्की

गटबाजी रोखण्यासाठी सत्ताधार्‍यांवर ‘व्हिप‘ची नामुष्की

Published On: Dec 14 2017 10:11AM | Last Updated: Dec 14 2017 10:11AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

महापालिकेच्या सायकल योजनेसह सार्वजनिक स्वच्छता उपविधी मंजुर करण्यासाठी सत्ताधारी भाजपने थेट नगरसेवकांना व्हीपच बजाविला आहे. भाजपमधील एका गटाने सायकल योजनेला विरोध करण्याचा निर्णय घेतल्याने ही योजना मंजुर करण्याबरोबरच पक्षातील गटबाजी रोखण्यासाठी व्हीप बजाविण्याची नामुष्की सत्ताधार्‍यावर आली आहे. 

महापालिकेकडून शहरासाठी सायकल योजना राबविण्यात येणार आहे. त्यासंबधीचे धोरण प्रशासनाने आखले असून त्यास मंजुरी देण्यासाठी आज गुरूवारी खास सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सार्वजनिक स्वच्छता उपविधीच्या मंजुरीचा प्रस्ताव आहे. मात्र, यामधील सायकल योजनेला भाजपमधील एका गटाने विरोध दर्शविला आहे. तसेच मुख्यसभेतही या योजनेच्या विरोधात मतदान करण्याचा पवित्रा या गटाने घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजप नगरसेवकांची बैठक महापौर बंगल्यावर आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीला भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि महापलिका आयुक्त कुणाल कुमार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला सायकल योजनेचे सादरीकरण करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी योजनेसंदर्भात नगरसेवकांना माहिती दिली. त्यावर काही नगरसेवकांनी या योजनेच्या माध्यमातून पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी होणार असल्याचे सांगितले. मात्र या दोन्ही योजना मंजुर करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. वरिष्ठ पातळीवरूनच तसे आदेश असल्याचे संबधितांना सांगण्यात आले. 

दरम्यान या योजनेला विरोध करणार्‍या नगरसेवकांनी गुरूवारी मुख्यसभेत विरोधात मतदान केल्यास पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर येऊ नये. यासाठी नगरसेवकांना व्हिप बजाविण्यात आला असल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली आहे. मात्र महापालिकेत भाजपचे ९८ नगरसेवक आणि एकहाती सत्ता असताना किरकोळ कारणासाठी भाजपवर व्हिप बजाविण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

बापट गटाची सरशी !
भाजपमधील एका गटाने थेट पालक मंत्री गिरीश बापट यांना शह देण्यासाठी काही योजनांना विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. या गटाने नगरसेवकांची बैठक घेऊन शक्ती प्रदर्शनही केले होते. मात्र बापट यांनी वरिष्ठ पातळीवरून सुत्रे हालवली आणि थेट नगरसेवकांना व्हिप बजावून योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतल्याने बापट गटाची सरशी झाल्याचे चित्र आहे.

तीनशे कोटींची उधळपट्टी होणार का ?
सायकल योजनेला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असली तरी या योजनेतील सायकल ट्रॅकला सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध आहे. मात्र पक्ष आदेशामुळे काही बोलता येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आत्ता सत्ताधारी भाजप नगरसेवकांना विरोध डावलून सायकल ट्रॅकच्या नावाखाली तीनशे कोटींची उधळपट्टी करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.