Tue, Jul 07, 2020 08:12होमपेज › Pune ›  आजच्या सर्वसाधारण सभेत रणसंग्राम?

 आजच्या सर्वसाधारण सभेत रणसंग्राम?

Published On: Apr 20 2018 1:16AM | Last Updated: Apr 20 2018 12:52AMपिंपरी ः प्रतिनिधी

महापालिकेच्या वतीने मोशी कचरा डेपोत ‘डीबीओटी’ तत्वावर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पास राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेपाठोपाठ सत्ताधारी भाजपच्याच काही नगरसेवकांनीही उघड व छुपा विरोध केला आहे. घरोघरचा कचरा संकलन व मोशी कचरा डेपोत नेऊन टाकण्याची वादग्रस्त निविदा रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या ही प्रकल्पावरून शुक्रवारी (दि.20) होणार्‍या सर्वसाधारण सभेत वाद निर्माण होऊन, ‘रणसंग्राम’ घडण्याची दाट शक्यता आहे.  

मोशी कचरा डेपोतील नियोजित ‘वेस्टू टू एनर्जी’ प्रकल्प मुंबईच्या अन्टोनी लारा एन्व्हायरो प्रा. लि. व ए. जी. एन्व्हायरो यांचे भागीदार कंपन्यांस प्रती टन 504 रूपये दराने देण्यास स्थायी समितीने 28 फेबु्रवारीला मान्यता दिली आहे. रोज पालिका 1 हजार टन कचरा देणार आहे. प्रकल्पासाठी कंपनी 208 कोटी 36 लाख रूपये खर्च करणार असून, पालिका आर्थिक सहाय म्हणून 50 कोटींचा निधी देणार आहे. प्रकल्प दीड वर्षात उभारला जाणार आहे. प्रकल्पातून तयार होणारा 12 ते 13 मेगा वॅट वीज कंपनी पालिकेस 5 रूपये युनिट दराने विकणार आहे.तसेच, बांधकाम राडारोडा प्रकल्प देखील सुरु केले जाणार आहे. त्या प्रकल्पास मंजुरी देण्याचा विषय शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. 

देशभरातील या प्रकारचे प्रकल्प अपयशी ठरले असून, संबंधित ठेकेदारास दिलेला दर अधिक आहे, असा आरोप करीत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती न देता ती अधिकार्‍यांकडून लपविली जात असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेविकेने केला आहे. लोकप्रतिनिधींनाच या प्रकल्पाची माहिती नसताना त्याबाबत नागरिकांना काय सांगणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

संबंधित ठेकेदार कंपनीस 21 वर्षांसाठी एकरी वर्षाला 1 रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी पालिका 50 कोटीचे सहाय निधी देणार आहे. ठेकेदाराने तयार केलेली वीज विकत घेणार आहे. पालिका शहरात जमा होणारा कचरा ठेकेदाराला मोफत देऊन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रती टनास 504 रूपये अदा करणार आहे, या सर्व प्रकारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या विषयावरून शुक्रवारच्या सभागृहात वादळी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधार्‍यांना विरोधकांच्या तीव्र विरोधाचा सामना केला तरी, या प्रकल्पास मान्यता देण्याचा ‘व्हीप’ सत्ताधारी भाजपने ‘पार्टी मिटींग’ मध्ये दिला आहे. व्हीप भाजपचे किती नगरसेवक पाळतात, हे सभेत समजणार आहे. सत्ताधारी प्रकल्पास मंजुरी देणार का, कचर्‍याप्रमाणे हा विषयही रद्द करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.