Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Pune › एअरफोर्सचा पाणी पुरवठा महापालिकेकडून बंद

एअरफोर्सचा पाणी पुरवठा महापालिकेकडून बंद

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 12:39AMपुणे : प्रतिनिधी

लोहगाव जवळील एअरफोर्सचा पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी पाच पासून बंद केला आहे. एअरफोर्सच्या परिसरातून जाणारी ड्रेनेज लाईन कोणतीही पुर्वकल्पना न देता बंद केल्याने आणि त्यानंतर चर्चेसाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकार्‍यांना वेळ न दिल्याने, आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईमुळे  लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाणी पुरवठाही खंडीत होणार असून, त्याचा विमानतळाच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोहगावातून येणारी ड्रेनेज लाईन मुख्य चौकातून एअर फोर्ससच्या सीमा भितींतून उघड्यावरच पुढे जाते. गेल्या अनेक वर्षांपासून याच पध्दतीने उघड्यावरून ड्रेनेजचे पाणी वहात आहे. महापालिका हद्दीत येण्यापूर्वी लोहगाव ग्रामपंचायतीची ही ड्रेनेज लाईन एअरफोर्सच्या हद्दीतून टाकण्यात आली आहे. ही लाईन बंद करण्यास एअरफोर्स कडून पालिकेस सांगण्यात आले होते. त्यासाठी पर्यायी लाईन पालिकेकडून टाकण्यात येणार होती. त्यासाठीची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली असतानाच, सोमवारी एअरफोर्सने त्यांच्या हद्दीतून जाणारी ही ड्रेनेज लाईन दगड, माती तसेच सिमेंटचे बांधकाम करून बंद केली. त्यामुळे लोहगाव गावासह, त्या ड्रेनेज लाईनने वाहून जाणारे सर्व सांडपाणी आता थेट लोहगाव परिसरातील रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांनाच ड्रेनेजचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  

या प्रकारानंतर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी एअरफोर्सच्या अधिकार्‍यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना भेट नाकारण्यात आली. संबधित अधिकार्‍यांनी ही बाब आयुक्त सौरभ राव यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच एअरफोर्स कडून कोणतीही नोटीस अथवा सूचना न देता ही ड्रेनेजलाईन बंद केल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त राव यांनी या कारवाईला प्रत्युत्तर देत, संपूर्ण एअरफोर्सचा पाणी पुरवठाच बंद करण्याचे आदेश प्रशासनाला  दिले. त्यानंतर  पाणी पुरवठा विभागाने सायंकाळी एअरफोर्सचा पाणी पुरवठा खंडीत केला असल्याची माहीती प्रशासनाकडून देण्यात आली.