Wed, Apr 24, 2019 11:32होमपेज › Pune › मुंढव्यातील पबमध्ये गोळीबार; पोलिसांपर्यंत आवाज नाहीच!

मुंढव्यातील पबमध्ये गोळीबार; पोलिसांपर्यंत आवाज नाहीच!

Published On: Jun 20 2018 1:15AM | Last Updated: Jun 20 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी 

मुंढवा येथील ‘एफ-बीच’ नावाने प्रसिद्ध असलेल्या ‘वायकिकी’ या फाईव्ह स्टार पबमध्ये शुक्रवारी पहाटे दोन वाजता शहरातील दोन मातब्बर टोळ्यांच्या वादातून गोळीबार झाला. मात्र, ‘अगा असे काही घडलेची नाही’ म्हणत पोलिसांनी थेट हात वर केले आहेत. गेले दोन दिवस वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांमध्ये या गोळीबाराची जोरदार चर्चा असून, हे प्रकरण दडपल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दोन्ही म्होरके शहरातील दिग्गजांचे निकटवर्तीय असल्याचे समजते. 

विशाल मोदी यांच्या मालकीच्या ‘वायकिकी’ पबमध्ये शुक्रवारी ‘लेडिज नाईट’मुळे गुलहौशी तरुणाईची झुंबड उडते. या दिवशी तरुणींना पबमध्ये फ्री एंट्री बरोबरच मद्यही मोफत दिले जाते. या शुक्रवारी शहरातील दोन मातब्बर टोळीचे म्होरके पबमध्ये आले होते. त्यातील एका म्होरक्याच्या फर्माईशवरून डीजेने ‘हिअर दी साँग फॉर मिस्टर......’ असे म्हणत त्याचे नाव पुकारले. त्यावरून दुसर्‍या टोळीच्या म्होरक्याला खुन्नस चढली. दोघा म्होरक्यांमध्ये प्रथम बाचाबाची व धक्काबुक्की सुरू झाली. 

नंतर दोन्ही टोळीत धमासान सुरू झाले. त्यातून चिडलेल्या एका म्होरक्याने दहशत निर्माण करण्यासाठी आपल्या जवळील पिस्तूलमधून हवेत तीन-चार राऊंड फायर केले. त्यामुळे जमलेल्या गर्दीत प्रचंड घबराट पसरली आणि त्यांनी वाट दिसेल त्या मार्गाने पबमधून पळ कढला.

या गोळीबारानंतर पब सुनसान झाला. ज्याला घाबरविण्यासाठी गोळीबार केला गेला त्याने थेट पोलिस नियंत्रण कक्षात फोन करून पबमध्ये गोळीबार झाल्याचे कळविले. त्यानंतर नेहमीच्या खबरीनुसार घटना नोंद करण्याच्या प्रक्रियेऐवजी दोन्ही म्होरके बड्यांशी संबंधित असल्याने ही भानगड मिटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले. अखेर पहाटे दोन टोळक्यात दिलमजाई झाली. पोलिसांना गोळीबार झाल्याचे कळविणार्‍या तक्रारदाराने पोलीस ठाण्यात जाऊन फक्त बाचाबाची झाली अशी अदखलपात्र तक्रार (एनसी) नोंदविली. मात्र, या मिटवामिटवीपूर्वी एका गटाने पबमध्ये धुडगूस घालून प्रचंड प्रमाणात तोडफोड केली. 

वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणावर पडदा टाकला गेला असला तरी वरीष्ठ अधिकारी व शहर पोलिस दलात नाराजीच्या सुरात कुजबुज सुरू आहे. या गंभीर घटनेबाबत गुन्हा दाखल केला असता, तर कठोर कारवाई करून गुंडांवर दहशत निर्माण झाली असती, असे स्पष्ट मत काही वरीष्ठांनी व्यक्त केले.