Fri, Apr 26, 2019 15:20



होमपेज › Pune › करचुकव्या मल्टिप्लेक्सला दणका 

करचुकव्या मल्टिप्लेक्सला दणका 

Published On: Dec 12 2017 2:08AM | Last Updated: Dec 12 2017 12:12AM

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील सहा मल्टीप्लेक्स चालकांनी नियमबाह्य करमणूक कर वसूल केला. मात्र, तो शासनाकडे जमा केला नाही. ही बाब करमणूक कर विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर केलेल्या पहाणीत 68 कोटी 65 लाख रुपयांचा कर चुकविल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या प्रकरणाची सुनावणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात सुरू होती. त्यावर निर्णय देताना पाटील यांनी विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत कर भरण्याचे मल्टिप्लेक्स चालकांना कर भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे करबुडव्या मल्टिप्लेक्स चालकांना चांगलाच दणका बसला आहे. मल्टिप्लेक्स  त्रपटगृहांना राज्य सरकारकडून सुरुवातीचे तीन वर्षे 100 टक्के तर पुढील दोन वर्षे 70 टक्के कर प्रक्षकांना माफ केला जातो.

मात्र, या करमाफीच्या कालावधीत पुण्यातील बड्या सहा मल्टिप्लेक्स थिएटर्सच्या मालकांनी प्रेक्षकांकडून परस्पर हा कर वसूल केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या मल्टिप्लेक्सने नेमका किती करमणूक कर गोळा केला, याची माहिती घेण्यासाठी थिएटर्सचे दैनंदिन तिकीट विक्री अहवाल जिल्हा प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले. त्यातील नोंदीची तपासणी केल्यानंतर 68 कोटी 65 लाख रुपयांचा महसूल मल्टिप्लेक्स चालकांनी परस्पर खिशात घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. प्रशासनाने मल्टिप्लेक्स चालकांना कर भरण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्याविरोधात मल्टिप्लेक्सचालकांनी तत्कालीन विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती.

मात्र, आयुक्तांनी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम ठेवला होता. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या निर्णयाविरोधात मल्टिप्लेक्सचालकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दाद मागितली. त्यावर महसूलमंत्री पाटील यांनी महसूल वसूल करण्याचा आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे 68 कोटीं रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरी जमा होणार आहे.