पुणे: प्रतिनिधी
सरकारमध्ये राहून शिवसेनेने सातत्याने जी भूमिका मांडली तीच खासदार नाना पटोले यांनी भाजपच्या व्यासपीठावर मांडली. त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.’ ‘शिवसेना हा वाघ-सिंहाचा पक्ष आहे; त्यामुळे पटोले आमच्याकडे आले तरी काही हरकत नाही,’ असे सूचक वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकार्यांची खा. राऊत यांनी शनिवारी शहर पक्ष कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोर्हे, शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर आदी उपस्थित होते.
खा. राऊत म्हणाले, ‘विदर्भात प्रस्थापितांच्या विरोधात बंडाची मोठी परंपरा आहे. शेतकरी आणि कष्टकरी हिताची भूमिका कायम ठेवल्यास जांबुवंतराव धोटे यांच्याप्रमाणे भविष्यात नाना पटोले हेसुद्धा विदर्भसिंह होतील. विदर्भातील नेतृत्वाची पोकळी ते भरून काढू शकतात. नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा हा मोदी सरकारविरोधातील उद्रेक आहे. विदर्भातील जनतेची भावना त्यातून दिसून येत आहे, ’ असेही खा. राऊत म्हणाले.
जाहिरातीशिवाय हे सरकार जनतपेर्यंत पोहोचू शकत नाही. दिलेली आश्वासने पूर्ण केली असती, तर सरकारवर जाहिरातबाजी करण्याची वेळ आली नसती. गुजरात निवडणुकांमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही निवडणूक जड जात असल्याने पंतप्रधान पातळी सोडून प्रचार करत आहेत. त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखावी. प्रचारसभा पाहिल्यावर राहुल गांधी नेते म्हणून उदयास येत असल्याचे दिसते. लोकही त्यांची भाषणे आवर्जून ऐकतात. ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे 2014 च्या निवडणुकीवेळी वाटायचे. मात्र आता परिस्थिती बदलत आहे, असे म्हणत राऊत यांनी राहुल गांधींचे कौतुक केले.