Sat, Feb 23, 2019 14:13होमपेज › Pune › मॉडर्न कॅफेच्या भटारखान्यात आग

मॉडर्न कॅफेच्या भटारखान्यात आग

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 12:16AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

मुंबईतील कमला मिल कंपाउंडमधील हॉटेलमधील आगीची घटना ताजी असतानाच पुण्याच्या शिवाजीनगर भागातील सुप्रसिद्ध हॉटेल मॉडर्न कॅफेच्या भटारखान्यातील चिमणीने पेट घेतली. ही घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास घडली.  हॉटेलचे कर्मचारी व ग्राहक यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. तर, दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार,  शिवाजीनगर येथील मॉडर्न कॅफेमध्ये गर्दी असते. दरम्यान, रविवारी दुपारी एकच्या सुमारास मॉडर्न कॅफेच्या भटारखान्यात आग लागली. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी व ग्राहकांनी तत्काळ बाहेर धाव घेतली व आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. कसबा अग्निशमन केंद्रातील फायरगाडी व एक वॉटर टँकर तातडीने तेथे दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे दाखल होत भटारखान्यातील पाच ते सहा सिलिंडर तातडीने बाहेर काढून आगीवर पाण्याचा मारा करून अवघ्या दहा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

या कामगिरीत कसबा अग्निशमन केंद्राचे अधिकारी रवींद्र आढाव, चालक गोरख गव्हाणे, तांडेल प्रकाश जाधव, अनिल करडे व जवान हरिश बुंदेले, समीर दळवी, नीलेश कर्णे, योगेश पिसाळ, अतुल खोपडे यांनी सहभाग घेतला. मॉडर्न कॅफेला लागलेल्या आगीमुळे पुन्हा एकदा शहरात असणार्‍या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉलमधील फायर ऑडिटचा प्रश्‍न समोर आला आहे.  अनेक हॉटेल्स बाहेर अतिक्रमणदेखील करण्यात आले आहे.