Tue, Apr 23, 2019 08:10होमपेज › Pune › आ. रमेश कदम यांच्या पत्नीसह दोघांना अटक

आ. रमेश कदम यांच्या पत्नीसह दोघांना अटक

Published On: Sep 02 2018 1:39AM | Last Updated: Sep 02 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील पावणेचारशे कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असणार्‍या आमदार रमेश कदम यांच्या पत्नीसह दोघांना सीआयडीच्या (गुन्हे अन्वेषण विभाग) पथकाने अटक केली. प्रतिभा रमेश कदम (40, रा. बोरीवली, मुंबई) व रामेश्वर पांडुरंग गाडेकर (वय 30) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. प्रतिभा कदम यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती सीआयडीच्या अधिकार्‍यांनी दिली. 

गाडेकर सीआयडीच्या पथकासमोर दोन दिवसांपूर्वी स्वतःहून हजर झाला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. कदम यांच्या पत्नीकडून बँकेच्या संयुक्त खात्याचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना आमदार रमेश कदम यांनी इतरांशी संगनमत करून 385 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी विविध ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. यामध्ये सीआयडीकडे आतापयर्यंत कदम याच्यासह 12 जणाना अटक केली आहे. कदम हा सध्या ठाणे येथील कारागृहात आहे. सीआयडीने अटक केलेल्या आरोपींकडे चौकशी केली. त्यावेळी कदम याचे बँक खाते ही त्याची पत्नी प्रतिभा कदम यांच्या नावावर संयुक्तपणे होते. त्याचा वापर त्यांच्याकडून केला जात होता, अशी माहिती समोर आली होती. त्यानंतर  सीआयडीचे पथक गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिभा कदम व गाडेकर यांचा शोध घेत होते. त्यांची माहिती मिळाल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता असल्याचे यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले.