Sat, Nov 17, 2018 04:28होमपेज › Pune › मिलिंद एकबोटे यांना अ‍ॅट्रॉसिटी न्यायालयाचे अटक वॉरंट

मिलिंद एकबोटे यांना अ‍ॅट्रॉसिटी न्यायालयाचे अटक वॉरंट

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:25AMपुणे  : प्रतिनिधी 

उच्च न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता  अ‍ॅट्रॉसिटीच्या विशेष न्यायालयाने समस्त हिंदू आघाडीचे  कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (61, रा. शिवाजीनगर) यांना अटक वॉरंट बजावले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात एका महिलेने शिक्रापूर पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या विविध कलमांनुसार फिर्याद दिली होती. त्यानुसार फिर्यादी या त्यांच्या नातेवाईक मुलांसह दि. 1 जानेवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनानिमित्त मानवंदना देण्यासाठी चालले होते. त्या दिवशी त्यांनी शिक्रापूर टोलनाका पास केल्यानंतर त्यांना सणसवाडी येथे दगडफेक, जाळपोळ सुरू असल्याचे दिसले.

त्या जमावाकडेे हत्यारे असल्याचेही पाहिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे; तसेच गाड्यांची तोडफोड होताना दिसली. या वेळी फिर्यादींवर प्राणघातक हल्‍ला करण्याचा प्रयत्न केला. ही सर्व घटना संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी घडवून आणली असल्याचे व डोळ्यांनी पाहिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दोघांवर अ‍ॅट्रॉसिटी, खुनाचा प्रयत्न, तोडफोड, बेकायदेशीर जमावप्रकरणी गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल होऊन गुन्हा शिक्रापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला होता. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम 18 नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही; त्यामुळे कोरेगाव भीमा प्रकरणातील  मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन सुरुवातीला सत्र न्यायालयाने फेटाळला होता.

त्यानंतर उच्च न्यायालयानेही एकबोटेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर विशेष न्यायालयाने एकबोटे यांना अटक वॉरंट बजावले आहे. मंगळवारी शिवाजीनगर कोर्टाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात एकबोटे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे. सात दिवसांत एकबोटे यांचा शोध लागला नाही, तर न्यायालयाकडून त्यांना फरार घोषित करून मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाऊ शकते. सध्या तरी एलसीबी व स्थानिक पोलिसांच्या पथकाकडून एकबोटे यांचा शोध सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.