Tue, Apr 23, 2019 14:18होमपेज › Pune › ‘मेट्रो’कडून 86 वृक्षांना जीवदान

‘मेट्रो’कडून 86 वृक्षांना जीवदान

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 07 2018 1:57AMपिंपरी :मिलिंद कांबळे 

पुणे मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. कामात अडथळा ठरणारी झाडे न तोडता त्याचे पुनर्रोपण केले जात आहे. महामेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्षांचे अद्ययावत पद्धतीने पुनर्रोपण करून त्या झाडांना जीवदान दिले आहे. ही पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिका व बांधकाम व्यावसायिकांनी अवलंबिल्यास शहरातील शेकडो झाडांना जीवदान मिळू शकते, असा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. 
मेट्रो मार्गिकेचे काम वेगात पुढे-पुढे सरकत आहे. पिलर उभारण्यासाठी अडथळे ठरणारी दुभाजकावरील सुमारे 135 मोठे वृक्ष न तोडता त्यांचे अद्ययावत पद्धतीने दुसरीकडे पुनर्रोपण केले जात आहे. 
शंकरवाडी, नाशिक फाटा चौकातील झाडे काढून ती पिंपरी-चिंचवड एसटीच्या वल्लभनगर आगारात लावण्यात आली आहेत. तसेच, नदीकाठ, पालिकेच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्प आणि नेहरूनगर येथील गुलाब उद्यानात आतापर्यंत एकूण 86 झाडांचे पुनर्रोपण केले आहे. सर्व झाडांनी मूळ धरले असून, ती सर्व जिवंत आहेत. काही झाडांना नव्याने पालवीही फुटली आहे.यामध्ये आरफळ, फास्कटेल पार्म, बदाम, गुलमोहर, खापा आदी विविध जातींची 5 ते 15 वर्षांची झाडे आहेत. कमी-कमी प्रमाणात मुळांना बाधा होईल, अशा रीतीने मूळ मातीसह गोणपाट्यात बांधण्यात येते. 

क्रेनद्वारे हे वृक्ष तेथून काढून वाहून नेऊन दुसरीकडे यशस्वीपणे लावले जातात. वृक्षाचे वयोमान आणि वजनानुसार त्याचा खर्च येतो. साधारण एका झाडाचा पुनर्रोपणाचा खर्च 50 हजार इतका आहे. 
मात्र, यामध्ये 5 ते 15 वर्षे वाढ झालेली झाडे न तोडता ती दुसरीकडे नेऊन जिवंत ठेवली जातात. त्यातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा हेतू पुणे मेट्रोने साधला आहेत. तसेच, कामाचा वेगही विनाअडथळा कायम ठेवला आहे. 

पर्यावरण समतोल 
राखण्याची गरज

शहरात मोठ्या संख्येने इमारती उभ्या राहत आहेत. बांधकाम, तसेच रस्ते व मोठ्या प्रकल्पांसाठी पालिका; तसेच बांधकाम व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतात. त्यासाठी पालिकेकडे शुल्क भरले जाते. चांगली वाढलेली झाले तोडून काँक्रिटचे जंगल निर्माण होत आहे. सरसकट झाडे न तोडता मेट्रोप्रमाणे पालिका व बांधकाम व्यावसायिकांनी झाडांचे पुनर्रोपण करून ती झाडे जगविण्याची गरज असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे. त्यामुळे शहराचा पर्यावरण समतोल राखण्यास मदतच होणार आहे.