पुणे :प्रतिनिधी
माहेरहून पैसे आणावेत यासाठी पती, सासू, सासरे यांच्याकडून होणार्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी येवलेवाडी येथे घडली. मृणाल विश्वजित चव्हाण (30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विश्वजित यशवंतराव चव्हाण (भुजबळ टाऊनशिप, कोथररूड) व सासू व सासर्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदा कामठे (58, येवलेवाडी कोंढवा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांची मुलगी मृणाल हिचा विश्वजित चव्हाण याच्याशी 2011 साली विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांपासून तिला पती विश्वजित व सासू-सासरे यांनी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. त्यानंतर पैसे नाही आणल्यास तिला टोचून बोलत तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. हा छळ दहा डिसेंबरपर्यंत वारंवार सुरू होता. त्यानंतर या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास पोलिस उपनिरीक्षक वाडकर करत आहेत.