Wed, Apr 24, 2019 07:29होमपेज › Pune › मराठी अकादमीचे संमेलन 1 जानेवारीपासून

मराठी अकादमीचे संमेलन 1 जानेवारीपासून

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:11AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

जागतिक मराठी अकादमीतर्फे ‘शोध मराठी मनाचा’  हे 15 वे जागतिक संमेलन 1 जानेवारीपासून बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. 3 जानेवारीपर्यंत चालणार्‍या या संमेलनाचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलिया येथील अभियंते व ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या मानाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविलेले डॉ. विजय जोशी भूषविणार आहेत. विविध क्षेत्रात जागतिक स्तरावर मराठीचा झेंडा फडकविणारे यशस्वी मराठी बांधव यानिमित्ताने एकाच छताखाली येऊन विचार, भावना आणि अनुभवांचे आदानप्रदान करणार आहेत, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत विकास ग्रुपचे संस्थापक- अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक सचिन ईटकर उपस्थित होते. या वेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे उद्घाटन करण्यात आले. 

रामदास फुटाणे म्हणाले, युरोप, अमेरिका, मध्य आफ्रिका आणि आशिया खंडातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मराठी बांधव संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन  1 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पुण्यातील चित्रकारांच्या रंगरेषा या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते होणार आहे.  2 जानेवारी  रोजी सकाळी 10 वाजता, समुद्रापलिकडे हा परिसंवाद होणार आहे. 3 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी अमित भंडारी संवाद  साधणार आहेत.