Thu, Feb 21, 2019 07:04होमपेज › Pune › सनातन संस्थेवर बंदी घाला; भीम आर्मी संघटनेची मागणी

सनातन संस्थेवर बंदी घाला; भीम आर्मी संघटनेची मागणी

Published On: Aug 25 2018 5:27PM | Last Updated: Aug 25 2018 5:27PMपुणे : प्रतिनिधी

धर्माच्या नावाखाली युवकांना दहशतवादी बनविणार्‍या, पुरोगामी, विचारवंत, विवेक वादांच्या हत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या सनातन संस्थेवर तत्काळ बंदी घालावी. तसेच, या सर्व प्रकरणांमध्ये मास्टर माईंड सनातनचे प्रमुख जयंत आठवले हे असून, धर्मरक्षण व धर्मसंरक्षण करण्याच्या नावाखाली युवकांना दहशतवादी करण्याचे व त्यांचा बुद्धिभेद करून त्यांच्या हत्या घडवून आणण्याचे खरे सूत्रधार जयंत आठवले हेच आहेत. अशी समाजाची धारणा असून, अशा व्यक्तीस तात्काळ अटक करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता पोळ यांनी केली आहे.

भीम आर्मी संघटनेतर्फे बालगंधर्व रंगमंदिराजवळ आज निदर्शने करण्यात आली. यावेळी निता अडगुळे सुशिला सोनवणे, दिपाली भालेराव, सिताराम गंगावणे, प्रदीप कांबळे, भीमराव कांबळे, रवी वडमारे, आलोक भींगारदिवे, मुकेश गायकवाड, शरद ओव्हाळ, अमर पंडागळे, महेश भिसे, संतोष पवार आदी उपस्थित होते.

यावेळी दत्ता पोळ म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश तसेच कलबुर्गी या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विचारवंतांच्या हत्या झाल्या. पोलीस तपासात या हत्यांच्या मागे सनातन संस्था असल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेले आरोपी हे सनातनचे साधक आणि सनातन संस्थेशी संबंधित आहेत. या पूर्वी सुद्धा अनेकदा समाजविघातक, देशविघातक प्रकरणांमध्ये सनातन संस्थेचे नाव आले आहे.