Tue, Jul 23, 2019 11:33होमपेज › Pune › जनआरोग्य’द्वारे उपचारास प्रतिसाद

जनआरोग्य’द्वारे उपचारास प्रतिसाद

Published On: Jan 30 2018 2:19AM | Last Updated: Jan 30 2018 12:10AMपुणे  :प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ (एमपीजेएवाय) द्वारे गेल्या वर्षी 31 हजार 334 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक उपचार हे कॅन्सरचे रुग्ण, हृदयविकार आणि मूत्रपिंडविषयक आजारांसाठी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे.  पूर्वीची ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ ही आता ‘एमपीजेएवाय’ नावाने ओळखली जाते. यामध्ये 971 प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. यामध्ये स्पेशालिटी, तसेच सुपरस्पेशालिटी स्वरूपाचे उपचार केले जातात. पिवळे रेशन कार्ड व केशरी रेशन कार्डधारकांसाठी या योजनेतून पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतात. 

रेशन कार्ड आणि रुग्णाचे ओळखपत्र (आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक) केवळ या दोन कागदपत्रांवर रुग्णावर उपचार होतात. जर, रुग्ण लहान मुलगा-मुलगी असेल, तर त्याच्या आई-वडिलांच्या कागदपत्रावरही रुग्णावर उपचार होतात. गरीब रुग्णांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. त्यामध्ये येत्या काही दिवसांत आणखी आजारांची भर पडणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2017 ला जिल्ह्यात 31 हजार 334 रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यापैकी सर्वाधिक 9 हजार 698 कर्करोगाच्या रुग्ण होते. कर्करोगाच्या रुग्णांमध्ये केमोथेरपी, शस्त्रक्रिया अणि रेडिएशन या प्रक्रियांचा समावेश आहे. काही रुग्णांना तीनही प्रकारचे उपचार देण्यात आले.

तर, दुसर्‍या क्रमांकवर हृदयरोगाचे रुग्ण असून, त्याद्वारे 6 हजार 211 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास, पेसमेकर बसविणे, व्हॉल्व बदलणे, तसेच सीव्हीटीएस या शस्त्रक्रियांचा समावेश होतो. तर, मूत्रपिंडविषयक (नेफ्रोलॉजी) 3 हजार 591 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये बहुतांश रुग्ण हे डायलेसिसचे आहेत. याव्यतिरिक्‍त अपघातात अनेक ठिकाणी हाडांची जखम झालेले (पॉलिट्रॉमा) 1 हजार 596, मेंदूविषयक शस्त्रक्रिया- 837, मेंदूउपचार (वैद्यकीय) - 344, डोळ्यांची शस्त्रक्रिया-336, हाडांची शस्त्रक्रिया वैद्यकीय उपचार- 659, श्‍वसनविषयक- 401, आतडेविषयक - 291, क्रिटिकल केअर- 241, प्लास्टिक सर्जरी- 28 आदी स्वरूपांचे उपचार करण्यात आले आहेत.