Tue, Apr 23, 2019 22:44होमपेज › Pune › फुलेंकडून विज्ञानाचा वापर समाजासाठी

फुलेंकडून विज्ञानाचा वापर समाजासाठी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

रुढी-परंपरांचा पगडा असलेल्या कालखंडात समाजाशी संघर्ष करीत महात्मा जोतिबा फुले यांनी सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक केली. आधुनिक विज्ञानाचा वापर समाजाच्या भल्यासाठी करण्याबाबत ते आग्रही होते. ते आधुनिक विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा विचार महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, तो  देशभर पसरला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या 127 व्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार मंगळवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माळी यांना पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार अ‍ॅड. जयदेव गायकवाड, समता परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे, माजी आमदार कमलताई ढोले-पाटील, पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, तुकाराम बिडकर, मोतीलाल सांखला, रवींद्र माळवदकर, बारसकर उपस्थित होते.

पवार म्हणाले, की फुले दाम्पत्याने शेतकर्‍यांच्या हितासाठी, बहुजनांना शिक्षणाची आणि स्त्री-शिक्षणासाठी मोठे कार्य केले. त्यांनी पाश्‍चिमात्य अन्नधान्यांच्या प्रजाती आणि संकरित गायी भारतात आणण्याचा आग्रह धरला. कृषी, स्त्री-शिक्षण, व्यवसाय क्षेत्रात महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करून बदल घडविल्यास नक्कीच देशाची प्रगती होईल.
छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या विचारांचा प्रसार देशाच्या कानाकोपर्‍यात केला. त्यातून फुलेंच्या विचारांची पताका नेणारी पिढी बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानात निर्माण झाली. त्यांनी केलेल्या संघर्षातूनच महात्मा फुले वाडा आणि परिसराचा विकास झाला आहे. फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले, असेही पवार म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह म्हणाले, की ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, आगामी संसद अधिवेशनात त्यासंदर्भातील निर्णय होईल. देशातील न्यायव्यवस्थेत अद्याप मागासवर्गीयांचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही. आरक्षण देतानाही पक्षपाती दृष्टिकोन ठेवला जातो. त्यामुळे खासगी क्षेत्रातही मागासवर्गीयांना आरक्षण देणे गरजेचे आहे. त्यावर संसदेतील मागासवर्गीय सदस्यांचे व्यासपीठ स्थापन करून समाजाचे प्रश्‍न पंतप्रधानांसमोर मांडण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्या, अशी मागणीही केली. या वेळी पुरस्कारार्थी डॉ. मा. गो. माळी, आमदार जयदेव गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. कृष्णकांत कुदळे यांनी प्रास्ताविक, तर प्रितेश गवळी यांनी आभार मानले.