पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महाळुंगे-माण प्रारूप नगररचना योजनेचा (टीपी स्किम) इरादा 5 ऑगस्ट 2017 रोजी जाहीर केला होता. त्यानुसार सात महिन्यांच्या कालावधीमध्ये टीपी स्किम योजना शनिवारी (दि. 24) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे महाळुंगे-माण टीपी स्किमचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रसिद्ध झालेल्या स्किमबद्दल सूचना व हरकतींसाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे, अशी माहिती ‘पीएमआरडीए’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद येथे राबविण्यात आलेल्या टीपी स्किमच्या धर्तीवर राज्यात टीपी स्किम राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 मध्ये सन 2014 मध्ये सुधारणा केली आहे. या बदलामुळे राज्यात नगररचना योजना राबविणे सुलभ झाले आहे. टीपी स्किमसाठी घेत असलेल्या जमिनीपैकी 50 टक्के जमीन विकसित करून जमीनमालकांना 2.5 एफएसआय लागू करून परत केली जाणार आहे.
टीपी स्किमचे एकूण क्षेत्रफळ साधारणपणे 250 हेक्टर इतके असून, उर्वरित 50 टक्क्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विस्थापितांकरिता 16.16 हेक्टर, बाग व खेळाच्या मैदानाकरिता 23.82 हेक्टर, सार्वजनिक सेवा सुविधांकरिता 93 हेक्टर, रस्त्यांखाली 48.50 हेक्टर आणि प्राधिकरणाकरिता 22.50 हेक्टर प्रस्तावित केले आहे. ही नगररचना योजना सेल्फ फायनान्सिंग तत्त्वावर तयार करण्यात आली आहे. प्राधिकरणास विक्रीतून प्राप्त होणार्या भूखंडातून टीपी स्किममध्ये समाविष्ट रस्ते, सार्वजनिक सेवा व सुविधा इत्यादीचा खर्च विक्रीयोग्य भूखंडातून केला जाणार आहे.
या योजनेचा नकाशा व जाहीर सूचना प्राधिकरण कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सूचना फलकावर लावण्यात आली आहे. शनिवारी (दि. 24) सूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, 30 दिवसांच्या आत स्किमबाबत आक्षेप किंवा सूचना असतील तर लेखी स्वरूपात महानगर आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयात सादर कराव्यात, असे ‘पीएमआरडीए’च्या वतीने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM
May 06 2018 1:54AM