Sun, May 26, 2019 14:40होमपेज › Pune › प्रेमविवाहाच्या रागातून बहिणीच्या पतीचे अपहरण

प्रेमविवाहाच्या रागातून बहिणीच्या पतीचे अपहरण

Published On: Aug 31 2018 1:43AM | Last Updated: Aug 31 2018 1:16AMपुणे : प्रतिनिधी 

बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघा भावांनी तिच्या पतीला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र त्यानंतर चित्रपटात शोभावा, असा पुणे ते माण असा थरारक पाठलाग करून सिंहगड पोलिसांनी दोघा भावांसह तिघांना अटक करून अपहरण केलेल्या व्यक्तीची सुटका केली. 

नंदू सुखदेव करांडे, नवनाथ काळेल (रा़ महुद, ता़  सांगोला़  जि. सोलापूर), रणजित करांडे (रा़  मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़  याप्रकरणी शोभा विजय दबडे यांनी फिर्याद दिली आहे़  तर विजय श्रीकांत दबडे (वय 28, रा़  श्रीव्हिला सोसायटी, आंबेगाव) यांची पोलिसांनी सुटका केली़ 

शोभा कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर विजय दबडे यांच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र शोभाच्या कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला संमती नव्हती. परंतु विजयच्या कुटुंबाने त्यांच्या विवाहाला मान्यता दिली.15 जुलै 2018 रोजी त्यांनी लग्न केले. त्यानंतर शोभाच्या कुटुंबीयांनी शोभा व विजयला फोन करून धमकावण्यास सुरुवात केली.  

दरम्यान बुधवारी सकाळी विजय नेहमीप्रमाणे जीममध्ये कामाला गेला़  त्यावेळी शोभाचा मावस भाऊ नवनाथ काळेल व सख्खा भाऊ नंदू करांडे यांनी नवले पुलाजवळ त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण केले आणि सातार्‍याच्या दिशेने कार नेली. तो जीममध्ये न आल्याने तेथील एकाने शोभाला फोन करून सांगितले. त्यामुळे तिने त्याच्या भावाला जीममध्ये पाठवले. त्यावेळी विजयची गाडी रस्त्यावर दिसली. तेथे चौकशी केल्यावर दोन, तीन लोकांनी विजयला मारहाण केली आणि त्याला सोडविण्यासाठी मध्ये पडल्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून विजयला कारमध्ये घालून नेल्याचे सांगितले.

तेथे दोन मोबाईल सापडले. त्यातील एक मोबाईल विजय आणि दुसरा नवनाथ काळेचा असल्याचे शोभाला लक्षात आले. त्यानंतर सिंहगड रोड पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली.   वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, स्मिता यादव, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी साळुंके, ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, विनोद महागडे, किरण देशमुख, संतोष सावंत, राहुल शेडगे, प्रशांत काकडे, विजय पोळ, संग्राम शिनगारे, निलेश जमदाडे, रफिक नदाफ यांच्या पथकाने लगेचच कामाला सुरुवात केली. पुणे, सोलापूर, सातारा ग्रामीण पोलिसांना फोन करुन माहिती देण्यात आली. त्याचवेळी मोबाइल तंत्रज्ञाकडून वेगवेगळ्या मोबाइल कंपनीचे आरोपीच्या मोबाइलचे टॉवर लोकेशन काढून पोलिसांना दिले. त्यानुसार सिंहगड रोड पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून सातारा जिल्ह्यातील माण येथील कुक्कडगाव घाटात तिघांना जेरबंद केले. तर विजयची सुटका केली.