Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Pune › पुणे-लोणावळा रेल्‍वे : सव्वा चार हजार कोटी निधी झारीतच

पुणे-लोणावळा रेल्‍वे : सव्वा चार हजार कोटी निधी झारीतच

Published On: Feb 02 2018 1:43AM | Last Updated: Feb 02 2018 1:24AMपुणे: प्रतिनिधी 

पुणे-लोणावळा दरम्यान आणखी दोन मार्गिका टाकण्यासाठी 4 हजार 240 कोटी रुपयांचा निधी सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना मंजूर केला होता. जेटली यांनी हे आश्‍वासन पाळत यंदाच्या अर्थसंकल्पात 4240 कोटींची तरतूद केली आहे. मात्र पुणे महापालिकेच्या आडमुठेपणामुळे तिसरी आणि चौथी मार्गिका प्रत्यक्षात येऊन पुणे-लोणावळा दरम्यानची कोंडी सुटण्याची शक्यता अतिशय धूसर आहे.

देशातील कोणतेही रेल्वे प्रकल्प त्या-त्या भागातील लाभार्थ्यांच्या आर्थिक सहभागातून साकारण्याचे धोरण पूर्वीच अमलात आलेले असल्याने आपल्या हद्दीतील विस्ताराच्या कामासाठी एक दशांश म्हणजे सुमारे चारशे कोटी रुपयांचा वाटा पुणे महापालिकेस उचलावा लागणार आहे. परंतु रेल्वेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटवून त्या जागा रेल्वेच्या स्वाधीन करण्याची ‘नाजूक’ कामगिरी करण्याची क्षमता नसलेल्या पुणे महापालिकेने त्यासाठी पैसे नसल्याची सबब पुढे करीत निधी मंजूर करण्याचे टाळले आहे. त्यामुळे रेल्वेने आणि प्रभूंप्रमाणेच जेटली यांनीही हजारो कोटी रुपयांची तरतूद करूनही तो प्रत्यक्षात वापरला न जाण्याची आणि पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांचे हाल संपुष्टात येण्याची शक्यता नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया काही जणांनी यावर व्यक्त केली आहे. 

दृष्टिक्षेपात भूसंपादन

 पुणे-लोणावळा प्रस्तावित तिसर्‍या व चौथ्या ट्रॅकसाठी 

(नवा लोकल कॉरिडॉर) अपेक्षित जमीन : 137.28 हेक्टर 

 एकूण उपलब्ध जमीन : 67.47 हेक्टर

 तिसर्‍या ट्रॅकसाठी आणखी अपेक्षित जमीन : 18.17 हेक्टर 

 चौथ्या ट्रॅकसाठी आणखी अपेक्षित जमीन : 50.74 हेक्टर 

 करावे लागणारे एकूण भूसंपादन : 68.91 हेक्टर