होमपेज › Pune › लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच

लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण लवकरच

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 06 2018 12:01AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली खासगी 15 एकर जमीन ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जागेच्या संपादनासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. ती जमीन ताब्यात घेतल्यानंतर एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाला दिली जाणार आहे; त्यामुळे लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न लवकर मार्गी लागणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

पुण्याचा होणारा विकास आणि हवाई प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन लोहगाव येथे अस्तित्वात असलेला विमानतळ अपुरा पडत आहे; त्यामुळे विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमानतळाच्या नऊशे मीटरच्या परिसरातील नो-डेव्हलपमेंटमधील खासगी जमीन मालकांची जागा ताब्यात घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता; त्यामुळे एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटीकडून विमानतळ विस्तारीकरणाचा आराखडाही तयार करून तो मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून, त्यास मान्यतादेखील मिळाली; मात्र विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेली जागा अद्याप ताब्यात येऊ न शकल्याने हे काम प्रलंबित असल्याचे काळे यांनी सांगितले. 

लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी 15 एकर जागा एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाला देण्यात येणार आहे; त्यामुळे लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न लवकर मार्गी लागणार आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.