Wed, Sep 26, 2018 12:36



होमपेज › Pune › पुणेः प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेस पदाधिकार्‍यांची तु-तु मै-मै

प्रदेशाध्यक्षांसमोर काँग्रेस पदाधिकार्‍यांची तु-तु मै-मै

Published On: May 02 2018 2:32PM | Last Updated: May 02 2018 2:34PM



पुणे : पांडुरंग सांडभोर

केंद्रापासून थेट महापालिकेपर्यंतची सत्ता गेल्यानंतरही काँग्रेसमधील कुरघोड्या थांबण्यास तयार नाहीत, याचा प्रत्यय सोमवारी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना आला. या दोन्ही नेते मंडळी समोरच शहर काँग्रेसमधील पदाधिकार्‍यांमध्ये तु-तु मै-मै रंगली, त्यावर अखेर प्रदेशाध्यक्षांनी आता मतभेद विसरा अन्यथा पुन्हा पायावर धोंडा पाडून घ्याल असा सल्ला पदाधिकार्‍यांना दिला.

काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष हे मंगळवारी एका विवाहानिमित्त पुण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांसाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शहर काँग्रेसमधील आजी-माजी पदाधिकार्‍यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत या पदाधिकार्‍यांची एक अनापौचारिक बैठक पार पडली. त्यात प्रामुख्याने आगामी निवडणुकीच्यादृष्टीने तयारीचा आढावा घेणे हा उद्देश होता. मात्र, या बैठकीत शहराच्या काही आजी-माजी पदाधिकार्‍यांनी एकमेकांविरोधातच तक्रारींचा पाढा वाचायला सुरूवात केली. पक्षात कोणीच कोणाचे ऐकत नाही. एकमेकांबदल गलिच्छ शब्दात टिका केली जाते. बैठकांना पदाधिकारी उपस्थित राहत नाहीत अशा आशयाचा तक्रारी सुरू झाल्या, त्यावर या नेते मंडळीसमोर पदाधिकार्‍यांची एकमेकांमध्ये तु-तु, मै-मै झाली. 

अखेर या सर्वांना थांबवत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी 'आता मतभेद सोडा आणि कामाला लागा असा सल्ला दिला'. अन्यथा पुन्हा आपणच आपल्या पायावर धोंडा मारुन घेऊ, जास्तीत जास्त आमदार निवडून आले तरच आपले सरकार येईल. हेच सरकार पुन्हा सत्तेवर आले तर आपल्याला आणखी वाईट दिवस येतील अशी भितीच या पदाधिकार्‍यांसमोर व्यक्त केली. तर मोहन प्रकाश यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणा, त्यांच्या घरी जा, त्यांच्या खाद्यांवर पक्षाचा पंजा टाका असा सल्ला उपस्थित पदधिकार्‍यांना दिला.

पत्रकारांना माहिती न देण्याची तंबी

प्रभारी आणि प्रदेशाध्यांनी घेतलेली बैठक अनापौचारिक होती. मात्र, या बैठकित पदधिकार्‍यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे बैठक संपविताना पत्रकारांना माहिती देऊ नका असा सज्जड दम देण्यात आला होता.