पुणे : प्रतिनिधी
पुणे-तळेगाव-पुणे दरम्यान रात्री सुटणार्या दोन लोकल काही दिवसांपूर्वी अचानक बंद करण्यात आल्या. यामुळे रात्रपाळीत काम करणार्या असंख्य प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पुण्याहून रात्री 11 वाजता सुटून तळेगाव येथे 11.50 वाजता पोहोचणारी 99908 पुणे-तळेगाव लोकल व तळेगावहून मध्यरात्री 12.05 वाजता सुटून 1.05 वाजता पुण्यात पोहोचणारी 99901 तळेगाव-पुणे लोकल अचानक बंद करण्यात आल्याने ऑफिसमधील रात्रपाळी संपवून घरी परतणार्या प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे. यामुळे खासगी वाहतूकदारांचे चांगलेच फावले असून, प्रवाशांची गरज लक्षात घेता त्यांच्याकडून आवाच्यासवा पैसे उकळले जात असल्याचे दिसून आले.
दरम्यान, तुरळक प्रवासी संख्येमुळे या दोन्ही लोकलची सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे, असे अजब उत्तर रेल्वे प्रशासनाने दिले आहे. या दोन्ही लोकल सुरू ठेवल्याने पुणे विभागाला प्रचंड तोटा होत असून, पुणे स्थानकावरील एक्स्प्रेस, मेल सेवेची वाहतूक सुकर व्हावी, या उद्देशाने या लोकल बंद केल्याचे धक्कादायक उत्तरही देण्यात आले. “रेल्वे सार्वजनिक वाहतुकीत मोडत असून, त्याची सेवा अचानक बंद करता येऊ शकत नाही. प्रतिसाद कमी आहे, असे कारण देणे हास्यास्पद आहे.