होमपेज › Pune › ‘पुलं’चे घर फोडणार्‍यांचा  ‘लक्ष्मी’चा शोध निष्फळ

‘पुलं’चे घर फोडणार्‍यांचा  ‘लक्ष्मी’चा शोध निष्फळ

Published On: Dec 20 2017 2:38AM | Last Updated: Dec 20 2017 2:29AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध साहित्यिक दिवंगत पु. ल. देशपांडे यांचे भांडारकर रस्त्यावरील बंद असणारे दोन फ्लॅट फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या घरातून चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला आहे. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या शेजारचे आणखी दोन फ्लॅट फोडले असून  या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे  पाच वर्षांपूर्वीही पुलंच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यावेळीही चोरट्यांच्या हाती पुस्तकांशिवाय काही लागले नव्हते. याप्रकरणी पुलंचे नातेवाईक महेश आरस (वय 59, रा. विलेपार्ले, पश्‍चिम मुंबई) यांनी डेक्कन पोलिसात फिर्याद दिली आहे. 

भांडारकर रस्त्यावरील ‘मालती माधव’ या इमारतीमधील दोन फ्लॅट मध्ये 1999 ते 2000 या कालावधीमध्ये पु. ल. वास्तव्यास होते. याठिकाणी त्यांचे काही हस्तलिखित साहित्य, पुस्तके तसेच फर्निचर आणि घरगुती वस्तू आहेत. त्यांचे नातेवाईक आरस यांचाही या ठिकाणी फ्लॅट आहे. रात्री चोरटे इमारतीच्या पाठीमागून आत शिरले. पुलंच्या फ्लॅटचे लोखंडी दरवाजे तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटामध्ये मौल्यवान वस्तूंचा शोध घेतला. परंतु, त्यांना पुस्तकांशिवाय काहीच हाती लागले नाही. त्यानंतर त्यांनी महेश आरस आणि अनिता रैना यांची घरे फोडली. त्या ठिकाणी त्यांना काहीच मिळाले नाही. 

इमारतीत असणारे  सीसीटीव्ही चोरट्यांनी उलट्या दिशेला फिरवून ठेवल्याने एकच चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, चोरटे जाताना एका व्यक्तीने पाहिले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांना माहिती मिळताच त्यांनी फिर्यादी आरस यांना माहिती दिली. डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, चोरट्यांनी काहीच नेले नसल्याने गुन्हाच दाखल केला गेला नाही. तसेच, त्याची साधी नोंदही करण्यात आली नाही. तसेच, याबाबत वरिष्ठांनाही कळविले नसल्याचे समोर आले.