Tue, Apr 23, 2019 13:37होमपेज › Pune › मुंढे यांची बदली होताच कामगार संघटनाचे राजकारण 

मुंढे यांची बदली होताच कामगार संघटनाचे राजकारण 

Published On: Mar 25 2018 1:52AM | Last Updated: Mar 25 2018 12:45AMपुणे : प्रतिनिधी 

‘पीएमपीएमएल’चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची मागील महिन्यात राज्य शासनाने बदली केल्यानंतर ‘पीएमपीएमएल’ कामगार संघटनांचे पदाधिकारी पुन्हा सक्रिय झाले असून, त्यांचा कार्यालयात वावर वाढू लागला आहे. तसेच त्याचे राजकारण सुरू झाले आहे. विशेषत: जवळच्या कर्मचार्‍याच्या बदल्यांसाठी प्रशासनावर दबाव टाकण्याचे काम करीत आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्षपदाचा पदभार मुंढे यांनी घेतल्यानंतर दहा महिन्याच्या कार्यकाळात मुंढे यांनी संघटनांच्या पदाधिकार्‍यांना कार्यालयात येण्यास मज्जाव केला तसेच काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. त्यामुळे एका अर्थाने संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे कंबरडेच मोडले होते. त्याचप्रमाणे मुंढे यांनी ‘पीएमपीएमएल’तील कामगार संघटना या मान्यताप्राप्त नसल्याचे सांगत त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सुद्धा नकार दिला होता.

संघटनेमधील काही पदाधिकार्‍यांना तर निलंबितसुद्धा केले होते. काही संघटनांची कार्यालये ‘पीएमपीएमएल’च्या जागेत अवघ्या किरकोळ दरामध्ये भाडे तत्त्वावर घेतली होती. मात्र त्या कामगार संघटनांना प्रशासकीय कामासाठी जागा हवी असल्याचे सांगून त्यांना खाली करण्यास सांगून प्रत्यक्षात ती खाली करून सुद्धा घेतली. तर काही संघटनांना नोटिसा देण्यात येऊन ती खाली करण्यास मुदत दिली होती. दरम्यान शहरातील राजकीय नेत्यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले होते.

त्यामुळे मुंढे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. या बदलीनंतर मात्र कामगार संघटना आणि त्यांचे पदाधिकारी आता सक्रिय झाले आहेत. तसेच त्यांचा राबता कार्यालयात जोरात सुरू झाला आहे. त्यातही कामगारांच्या बदल्यांसाठी जोमाने प्रयत्न करीत आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी पदभार घेताच संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. मुंढे यांच्या कार्यकाळात बदली झालेले वाहक आणि चालक यांना पूर्वीच्या ठिकाणी घेण्यासाठी जोर लावत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे काही कर्मचार्‍यांनी गैरवर्तन केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांचे निलंबन रद्द करण्यासाठी प्रयत्न करीत असताना दिसून येत आहेत.