Wed, Mar 20, 2019 23:21होमपेज › Pune › रविवार पेठ जीवघेण्या मांजाचे आगार

रविवार पेठ जीवघेण्या मांजाचे आगार

Published On: Feb 14 2018 2:55AM | Last Updated: Feb 14 2018 1:49AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील विविध भागांमध्ये तसेच उपनगरांमध्ये लहान दुकानांमध्येही उपलब्ध होणार्‍या जीवघेण्या  मांजाचे आगार हे रविवार पेठेत आहे. पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेल्या दुकानदारांकडे चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.    मात्र, गल्लीबोळात घातक मांजाची सर्रास विक्री केली जात असतानाही पोलिसांना संपूर्ण पुणे शहरात फक्त कोथरूड, खडक आणि वारजे माळवाडी परिसरात चारच मांजा विक्रेते सापडले आहेत. याप्रकरणी त्यांनी चार दुकानदारांवर  गुन्हे दाखल केले आहेत. 
गेल्या आठवड्यात शिवाजी पुलावर सुवर्णा मुजूमदार यांचा मांजामुळे मृत्यू झाला.

त्यानंतर मांजाचा प्रश्‍न ऐरणीवर आला. सर्वसामान्यांकडून टिकेची झोड उठल्यानंतर पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. मांजा विक्रीसाठी गुन्हे शाखेची वेगळी सात पथके तयार करण्यात आली. तर, स्थानिक पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त रश्मी शुक्‍ला यांनी दिले.  त्यानुसार पोलिसांनी परिसरातील दुकानांवर कारवाई सुरुवात केली. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये पोलिसांना केवळ संपूर्ण शहरात चार दुकानदार मांजाची विक्री करताना सापडले आहेत. 

दरम्यान कारवाईच्या भीतीपोटी शहरातील दुकानदारांकडून मांजा लपविण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच पोलिसांच्या पथकांना गेल्या तीन दिवसांमध्ये एकाही ठिकाणी मांजा सापडला नसल्याचे दिसत आहे. उपनगरांमध्ये लहान दुकानांतही या बंदी असणार्‍या नायलॉन मांजाची विक्री होत आहे. त्यामुळे पोलिसांसमोरही अडचण निर्माण झाली आहे.

रविवार पेठ, सोमवार पेठेसह मध्यवस्थीतील सर्व दुकाने पोलिसांकडून तपासली; परंतु, एकाही दुकानात पोलिसांना मांजा सापडलेला नाही. शहरातील लहान दुकानदार रविवार पेठेतून ठोक स्वरूपात हा नायलॉन मांजा विकत घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चिनी मांजा भेटत नसल्याचीही माहिती समोर आली आहे. मांजाचे आगार रविवार पेठ असताना पोलिसांना येथील एकाही दुकानावर मांजा विक्री करताना सापडले नसल्याने आश्‍चर्य व्यक्क्त होते आहे.