पुणे : प्रतिनिधी
ससून सर्वोपचार रूग्णालयात दोन्ही मूत्रपिंड निकामी 40 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंड (किडणी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रविवारी पहाटे यशस्वी झाली. या रुग्णाला ससूनमधील ब्रेनडेड झालेल्या रूग्णानेच मूत्रपिंड दान केले असून त्याचे यकृत (लिव्हर) दीनानाथ मंगेशकर तर आणखी एक मुत्रपिंड थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आले. खाजगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी पाच ते सहा लाख रुपये मोजावे लागतात ती इथे अत्यल्प दरात पार पडली आहे. ससूनच्या इतिहासातील ही दुसरी तर या वर्षीची पहिली मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. यामध्ये धानोरी येथील 21 वर्षाच्या ब्रेनडेड झालेल्या तरूणाने अवयवदान केल्याने तिघांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.
हा तरूण पेंटिंगचे काम करत होता. गेल्या आठवड्यात पेंटिंग करताना तो विजेचा धक्का लागून पडला. यामध्ये डोक्याला मार लागला होता. सुरवातीला त्याच्यावर येरवडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर त्याच्यावर ससूनच्या अतिदक्षता विभागात 3 जानेवारी पासून उपचार सूरू होते. मात्र उपचार सूरू असतानादेखील त्याची प्रकृती खालावली आणि त्याला डॉक्टरांनी सहा जानेवारीला सायंकाळी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक अर्जुन राठोड आणि संदीप खरात यांनी रूग्णाच्या नातेवाईकांना अवयवदान संदर्भात माहिती देत त्यांचे समुदेशन केले. त्यानंतर नातेवाईकांनी अवयदानास संमती दिली.
ससून रूग्णालयात प्रतिक्षा यादीत असणार्या पुण्यातील रहिवाशी असलेल्या एका 40 वर्षाच्या रूग्णाचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाले होते. त्याच्यावर रविवारी पहाटे दोनच्या दरम्यान प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. अभय सदरे, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. किरणकुमार जाधव, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. रोहिदास बोरसे आदींनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. ससूनमध्ये गेल्या दीड वर्षात तीन पुरूष आणि तीन महिला अशा सहा ब्रेन डेड झालेल्या रुग्णांचे यकृत, मुुत्रपिंड, कॉर्निया, ह्रदय असे एकुण 21 अवयव इतर रुग्णालयांतील विविध गरजू रूग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आले आहेत.