Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Pune › मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तिघे वेटिंगवर

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तिघे वेटिंगवर

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:44AM

बुकमार्क करा
 पुणे : प्रतिनिधी

  ससूनमध्ये रविवारी पहाटे 40 वर्षीय रुग्णावर मूत्रपिंड (किडणी) प्रत्यारोपण झाल्यामुळे आता ससूनवरील रुग्णांचा सकारात्मक विश्‍वास वाढीस लागला आहे. ससूनकडे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करवून घेण्यासाठी रुग्णांचा कल वाढू लागला असून, सध्या तीन रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीत आहेत.  ससून रुग्णालयात काळानुरूप सर्वसामान्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध होत आहेत; त्यामुळे गेल्या सात-आठ वर्षांमध्ये ससूनकडे येणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, याचाच परिपाक म्हणजे ससूनमध्ये रविवारी दुसरे मूत्रपिंड प्रत्यारोपण 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत केले आहे. याच प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयांत सहा ते दहा लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे; त्यामुळे ससून हे गरीब रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीदेखील उपयुक्त ठरत आहे. मूत्रपिंड हे रक्तातील हानिकारक व अनावश्यक घटक लघवीच्या स्वरूपात बाजूला करते.  प्रत्येकाच्या शरीरात जन्मजात दोन मूत्रपिंड असतात; पण एक मूत्रपिंडही पुरेसे असते. मूत्रपिंड निकामी होण्याची पुष्कळ कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने 

हृदयविकार, विशिष्ट औषधांचे कायम सेवन, कमी झालेला रक्तप्रवाह, रक्तदाब, अतिमद्यपान, मूत्रपिंड संसर्ग आदी कारणांमुळे दोन्ही मूत्रपिंड निकामी होऊ शकतात. त्यानंतर त्या व्यक्तीला पायाला सूज येणे, रक्तातील क्रियाटिनीन या घातक घटकाची वाढ होणे, थकवा येणे, लघवी कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. या वेळी त्याला जन्मभर डायलेसिस करणे अथवा मूत्रपिंड प्रत्यारोपण करवून घेणे गरजेचे पडते.  पुणे अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती  (झेडटीसीसी) च्या समन्वयक आरती गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांची संख्या 760 आहे. त्यांनी ब्रेनडेड रुग्णांचे (कॅडेव्हर) मूत्रपिंड मिळण्यासाठी विविध रुग्णालयांद्वारे ‘झेडटीसीसी’कडे नोंद केली आहे. तरी, ज्यांना नातेवाईक मूत्रपिंड देण्यास तयार होतात त्या रुग्णांची नोंद 
‘झेडटीसीसी’कडे होत नाही. अशा रुग्णांची संख्यादेखील शेकडोंच्या घरात असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत कॅडेव्हर मूत्रपिंड मिळण्यासाठी पाच रुग्णांनी ससूनमध्ये नोंद केली होती. त्यापैकी दोघांवर प्रत्यारोपण झाले असून, या आठवड्यात आणखी तिघांची नोंद होणार आहे, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अवयव प्रत्यारोपण समन्वयक अर्जुन राठोड यांनी दिली.