होमपेज › Pune › ‘त्यांनी’ माझ्याकडे लक्ष द्यावे, म्हणून अपहरणाचा बनाव

तिसरीतील विद्यार्थ्याकडून अपहरणाचा बनाव

Published On: Dec 02 2017 2:08AM | Last Updated: Dec 02 2017 2:08AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

आई-वडील लक्ष देत नसल्याने त्यांना चांगली अद्दल घडविण्यासाठी चक्क मुलाने ( इयत्ता तिसरी)अपहरणाचा बनाव रचल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. आई-वडिलांनी लक्ष द्यावे, यासाठी त्याने असे केल्याचे स्पष्ट झाले आहे. लष्कर परिसरात हा प्रकार घडला असून, पोलिसांसह शाळा आणि पालकांची चांगलीच धावपळ उडाली. विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली आहे. 

हा विद्यार्थी लष्कर परिसरातील एका नामांकित शाळेत तिसरीत शिक्षण घेत आहे. तो एकुलता एक आहे. त्याचे वडील व्यावसायिक आहेत. तर, आई गृहिणी आहे. तो तीन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शाळेत  आला. दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यास निघाला. मात्र, शाळेतून बाहेर पडताच, दुचाकीवर चेहर्‍याला मास्क लावून आलेल्या चार व्यक्तींनी मला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. पण, मी त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि धावत पळत घरी आलो, असे त्याने घरी येऊन आईला सांगितले. 

त्यानंतर मात्र, सुरू झाली एकच धावपळ. त्यांनी तात्काळ त्यांच्या पतीला याबाबत माहिती दिली. तेही सर्व कामे सोडून घरी आले. मुलाकडे घटनेबाबत पुन्हा  विचारणा केली. त्याने पुन्हा वडिलांना तसाच घटनाक्रमस सांगितला.  मुलाच्या काळजी पोटी आई-वडिलांनी तत्काळ शाळेत धाव घेतली. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.  शाळा प्रशासनानेही याची तत्काळ दखल घेत लष्कर पोलिसांना कळवले. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणावरून मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे समजताच पोलिसही फौजफाट्यासह शाळेत पोहचले. त्यांनी सर्व घटनेची माहिती घेतली. मुलाकडे विचारपूस केली. त्यावेळी मात्र, पोलिसांना संशय आला. त्यांनी मुलाला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने असे काही घडलेच नसून, अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. आई-वडिल लक्ष देत नाहीत. ते त्यांच्याच कामात व्यस्त असतात. त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावे, यासाठी आपण, असे केले असल्याचे त्यांना सांगितले. 

अपहरणाच्या दोन घटना 
अपहरणाचा हा बनाव समोर आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि: श्‍वास टाकला. परंतु, याघटनेपूर्वी त्याच शाळेतील विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुलगा आई-वडिलांकडे सुरक्षित आहे. या मुलाच्या पालकांना लष्कर पोलिसांकडून तीन ते चार दिवसांपासून बोलविण्यात येत आहे. परंतु, मुलाचे पालक पोलिसांकडे येत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ती नेमकी घटना काय, हे समजू शकलेले नाही. दरम्यान लष्कर पोलिसांनी यानंतर शाळा प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. तसेच, मुलांना शाळा सुटल्यानंतर जबाबदार व्यक्तींकडेच द्या, असेही सांगितले आहे. तर, परिसरात पेट्रोलिंग आणि गस्त वाढविण्यात आली आहे.