Mon, Apr 22, 2019 21:40होमपेज › Pune › खडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट

खडकी रेल्वे स्टेशन पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट

Published On: Jan 10 2018 5:08PM | Last Updated: Jan 10 2018 5:08PM

बुकमार्क करा
पुणे: प्रतिनिधी 

खडकी रेल्वे स्टेशन येथील पार्किंगमध्ये दुचाकीस्वारांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वे स्टेशनबाहेर दुचाकी पार्किंग आहे. कूपनवर सहा तासांसाठी पाच रुपये असे छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, दुचाकीस्वारांकडून सहा तासांसाठी तब्बल 20 ते 30 रुपये उकळले जात असल्याचे दिसून आले. दैनिक पुढारीच्या वाचकाने याबाबतची माहिती दिल्यानंतर खातरजमा करण्यात आली. दुचाकीस्वारांना तोंडाला येईल ती रक्कम सांगितली जात असल्याचे त्यात उघड झाले आहे. 

सही व शिक्क्याशिवाय पार्किंग कूपन ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे पावतीवर छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र, कूपनवर सही, शिक्का नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. त्याचप्रमाणे गाडी चोरीला गेल्यास, गाडीची तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदारी घेणार नाही, असे त्या कूपनवर नमूद करण्यात आले आहे. दररोज हजारोच्या संख्येने या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यात येतात. येथील ठेकेदार दुचाकीस्वारांशी उद्धट बोलत असल्याचेही सांगण्यात आले. नियमाप्रमाणे पैसे घेतले जात आहेत की नाही, हे पाहणारी यंत्रणाच येथे उपलब्ध नाही. दरम्यान, या प्रकाराबाबत दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.