Wed, Jan 22, 2020 13:59होमपेज › Pune › हिंमत असेल, तर संविधान बदलून दाखवावे

हिंमत असेल, तर संविधान बदलून दाखवावे

Published On: Jan 01 2018 2:02AM | Last Updated: Jan 01 2018 1:20AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

लोकशाही आणि संविधान संपविण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ करीत आहे. मात्र, हिंमत असेल, तर त्यांनी संविधान बदलून दाखवावे, अशा कडव्या शब्दांत नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपने असा प्रयत्न केल्यास आम्ही त्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.  भीमा-कोरेगावच्या लढाईला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भीमा कोरेगाव शौर्य दिन अभियानातर्फे आयोजित एल्गार परिषदेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला, उमर खालिद, उल्का महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहरी आदी उपस्थित होते.  

या वेळी मेवाणी म्हणाले, की लोकशाही आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न करणार्‍या भारतीय जनता पक्षाला आम्ही गुजरातमध्ये दीडशे जागांवरून 99 जागांवर आणून ठेवले आहे.  येत्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून नागपुरात संघ समाप्ती अभियान राबविण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. कोळसे पाटील म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी घराघरांतून नोटबंदीच्या काळात पैसे काढले. सरकार स्किलफुल इंडिया नाही, तर किल इंडिया धोरण राबवत असल्याचा शाब्दिक वार त्यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित जनसमुदायला संविधानाचा सन्मान राखण्याची शपथ दिली. संविधानाचा सन्मान न करणार्‍यांना मतदान करणार नाही, असेही यात नमूद होते. राधिका वेमुला, उमर खालिद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.