Sat, Apr 20, 2019 07:54होमपेज › Pune › आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला लुटले

आयटी इंजिनिअर तरुण-तरुणीला लुटले

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 1:23AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मैत्रिणीला घरी सोडविण्यासाठी निघालेल्या आयटी इंजिनिअर तरुणाच्या दुचाकीला दोन दुचाकींची धडक देऊन चौघांनी वाद घातला. तसेच चाकूच्या धाकाने दोघांकडील मोबाईल आणि रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औंध रस्त्यावरील डी. मार्ट मॉलजवळ हा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी क्रिपा तपनकुमार दास (वय 28, रा. सायली गार्डन, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दास या आयटी इंजिनिअर आहेत. तर, त्यांचा मित्र नितीन शर्मा हा सांगवीत राहण्यास आहे. त्या कामानिमित्त त्यांच्याकडे आल्या होत्या. दरम्यान मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास  फिर्यादी यांचा मित्र शर्मा हा दुचाकीवरून त्यांना सोडविण्यासाठी औंध परिसरात निघाला होता. तो औंध रस्त्यावरील डी. मार्ट मॉलजवळ आल्यानंतर समोरून आलेल्या दोन दुचाकीवरील चौघांनी फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली. तसेच, त्यांच्याशी वाद घातला. चौघांनी दास व त्यांचा मित्र शर्मा याला चाकूचा धाक  दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, हातातील घड्याळ आणि दीड हजाराची रोकड जबरदस्तीने घेऊन पसार झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. चतु:श्रुंगी पोलिस दाखल झाले, परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक केंजळेे करीत आहेत.