Thu, Apr 25, 2019 16:06होमपेज › Pune › असा टाळा उष्माघात (Video)

असा टाळा उष्माघात (Video)

Published On: Apr 25 2018 9:01PM | Last Updated: Apr 25 2018 9:06PMपुणे : प्रतिनिधी

राज्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाची तिव्रता चागलीच जाणवत आहे. या वाढत्‍या अष्‍म्‍याने नागरिक हैरान झाले आहेत. त्‍यामुळे उष्माघाताची लागण होऊ नये म्हणून खास ‘पुढारी’च्या वाचकांसाठी राज्याच्या साथरोग अधिकार्‍यांची ही विशेष मुलाखत घेण्यात आली. यामध्ये उष्माघात म्हणजे काय?, उष्माघाताचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर ‘पुढारी ऑनलाइन’शी राज्याचे साथरोग अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. उष्माघातापासून आपला बचाव कसा कराल जाणून घ्या सोबतच्या विशेष वृत्तावरून.
उष्माघात टाळण्यासाठी काय कराल?

उष्माघात टाळण्यासाठी डोळ्यांना गॉगल वापरणे, डोक्यावर टोपी,रूमाल अशा किरकोळ गोष्टीचा वापर करायला हवा. तसेच, ११ ते ३ या वेळेत काम करणे टाळले पाहिजे. त्याशिवाय, काळ्या रंगाचे किंवा उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नयेत. त्याऐवजी, सैल आणि शक्यतो पांढर्‍या रंगाचे कपडे वापरावेत. ठरावीक वेळेनंतर थोडे - थोडे पाणी पीत राहणे, जलसंजीवनी(विविध पेय) जसे ताक, लिंबू सरबत प्यावे. मात्र, या दिवसात कोल्ड्रीक्स कटाक्षाने टाळले पाहिजे. कोल्ड्रीक्समुळे उष्णता शोषण्याचा विपरीत परिणाम आपल्‍या शरिरावर होऊ शकतो.

उष्माघात म्हणजे काय?

उष्माघाताची समस्या मार्च, एप्रिल, मे आणि जूनच्या काही दिवसात जाणवते. तीव्र उन्हामध्ये आपण फिरल्यानंतर आपल्याला काही लक्षणे आढळून येतात. उन्हाच्या तीव्रतेनुसार त्या लक्षणांचे वर्गीकरण होते. उन्हामध्ये फिरल्यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे या सारखी उष्माघाताची लक्षणे असू शकतात. तसेच, पायात पेंटके येणे, रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीला ताप येऊन बेशुद्धावस्थेत जाण्याचे लक्षणे दिसू शकतात. ही उष्माघाताची गंभीर लक्षणे आहेत. यामुळे व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

....या व्यक्तींना लागण होण्याचा धोका जास्त

वयोगटानुसार यात भिन्नता पाहायला मिळते. पासष्ट वर्षावरील वृद्ध व्यक्ती, १ ते ५ वर्षातील मुले, गरोदर माता, मधुमेह असलेले व्यक्ती, ॠदयविकार असलेले किंवा दारूच्या अधीन असलेल्या व्यक्तींना सामान्य व्यक्तीपेक्षा उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. उष्माघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हामध्ये फिरणे. दुपारी ११ ते ३ या वेळेत आपण उन्हामध्ये फिरणे टाळले पाहिजे. या चार तासांमध्ये उन्हाची तीव्रता जास्त असते.

उष्माघाताची लागण झाल्यावर या उपाययोजना कराव्यात..

उष्माघाताची लागण झाल्यावर प्रतिबंधात्मक उपायावर जास्त भर द्यायला हवा. उष्माघाताची घटना एखाद्या व्यक्तीबरोबर घडली असल्यास कुलर, पंख्‍याखाली त्‍याला बसवावे किंवा थंड पाण्याने त्या व्यक्तीला अंघोळ घालायला हवी. रूग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पंट्या, बर्फाच्या बॅग ठेवायला हव्यात. मागील वर्षी उष्माघाताने १२ लोकांचे मृत्यू  झाला होता. त्या तुलनेत यावर्षी हे प्रमाण कमी होऊन फक्त १ व्यक्ती उष्माघाताने दगावला आहे.