Thu, Jul 18, 2019 16:31होमपेज › Pune › पत्नीच्या खुनाचा प्रयत्न;  पतीचा जामीन फेटाळला

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न;  पतीचा जामीन फेटाळला

Published On: Dec 13 2017 2:39AM | Last Updated: Dec 13 2017 1:47AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीवर ब्लेडने वार करून खुनाचा प्रयत्न करणार्‍या  पतीचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणेर यांनी फेटाळून लावला आहे.  
ईस्माइल बळीराम सूर्यवंशी (35, रा. पिपरी) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी सुनीता (वय 30) यांनी पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 16 मे 2017 रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास पिंपरी, मोरवाडी येथील सार्वजनिक रस्त्यावर घडली.

ईस्माइल याला दारूचे व्यसन आहे. त्याची पत्नी सुनीता ही घटनेच्या दिवशी कामाला चालली होती. त्यावेळी त्याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने तिच्या गळा आणि गालावर चाकूने वार केले. तिला जिवे ठार मरण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ईस्माईल याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. जरी या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असले, तरी त्याला जामीन देणे योग्य नाही. कारण त्याने पत्नीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तो तिला साक्ष देण्यापासून परावृत्त करेल यामुळे तिच्या जिविताला धोका पोहचण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मंजूर केली.