Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Pune › एमएच १२, हार्नचे वाजवा ‘बारा’

एमएच १२, हार्नचे वाजवा ‘बारा’

Published On: Sep 13 2018 1:46AM | Last Updated: Sep 13 2018 1:37AMपुणे : प्रतिनिधी 

एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठ, पुणे आरटीओ विभाग व शहर वाहतूक विभागाच्या संयुक्त विद्यमाने एमआयटी कोथरूड कॅम्पसमध्ये ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’ ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘एमएच 12 हार्नचे वाजवा 12’ अशा घोषणा दिल्या. यावेळी आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  

दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे शारीरिक व मानसिक आजारसुद्धा वाढत जात आहेत. रस्त्यांवर ज्या पद्धतीने हॉर्न वाजविले जातात, त्यांच्या दुष्परिणामाचे एक उदाहरण म्हणजे उस्मानाबाद शहरात एका व्यक्तीची हत्या झाली. यापुढे अशा घटना थांबवण्यासाठी वाहनांचे हॉर्न वाजविणे टाळले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.  ‘आम्ही पुणेकर करणार नाही हॉर्नचा वापर....’ असा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला. तसेच ‘एमएच 12 हार्नचे वाजवा 12’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी यावेळी दिल्या. 
यावेळी एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, आरटीओ निरीक्षक चंद्रकांत माने, एमआयटीचे कुलगुरू डॉ. आय. के. भट, कुलसचिव प्रा. डी. पी.आपटे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आदी उपस्थित होते.

कौटुंबिक न्यायालयाच्यावतीने रॅली

पुणे ः  दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशच्या वतीने बुधवारी ‘नो हॉर्न डे’ साजरा करण्यात आला. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात ‘नो हॉर्न डे’ चे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आर. टी. ओ. कार्यालय यांना सोबत घेऊन ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाबाहेर रॅली काढून समाजात जनजागृती निर्माण केली. रॅलीत वकील वर्ग उपस्थित होता. रॅलीचे आयोजन दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे व त्यांच्या कार्यकारिणीने केले होत.