Fri, Mar 22, 2019 05:33
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › मधप्रक्रिया युनिट सर्वांसाठी खुले

मधप्रक्रिया युनिट सर्वांसाठी खुले

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:22AM

बुकमार्क करा

पुणे :शंकर कवडे

 जिल्ह्यासह राज्यातील शेतकर्‍यांना मधनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाश्या संशोधन व प्रशिक्षण केंद्राने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यापुढे केंद्रातील मधप्रक्रिया युनिटमधून सर्वांना प्रतिकिलोस 13 रुपये याप्रमाणे मधावर प्रक्रिया करता येणार आहे. सुरुवातीच्या काळात काही संस्थांसाठी सुरू असलेली ही सुविधा सर्वांसाठी खुली झाल्याने मध उत्पादकांमध्ये उत्पन्नाची नवी आशा निर्माण झाली आहे.  

शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाश्या संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 1989 साली पहिल्यांदा मधावर प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यात विशिष्ट संस्थांकडून मध गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत मधाची निर्मिती न झाल्याने हे केंद्र बंद होते. दरम्यान, मधमाश्यापालकांना मधनिर्मितीनंतर येणार्‍या अडचणींमधून सुटका होण्याच्या दृष्टीने सर्वांना मधप्रक्रिया केंद्र खुले करण्याचा नवीन निर्णय जाहीर करण्यात आला.  मधामध्ये साधारणत: 23 ते 24 टक्के पाणी असते. त्याच्या प्रमाणानुसार मधाचे वर्गीकरण करण्यात येते. 20 टक्क्यांपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी असलेला मध स्पेशल ग्रेड, 22 ते 22 टक्क्यांच्या दरम्यान असलेला ए ग्रेड तर 22 ते 24 टक्क्यांचे प्रमाण असलेला मध हा स्टॅण्डर्ड दर्जा म्हणून विकला जातो.

यामध्ये स्पेशल ग्रेड मधाला सर्वाधिक मागणी राहते. दरम्यान, गेल्या काही वर्षांत जिल्ह्यासह राज्यात मधमाश्यापालक तयार झाले आहेत. त्याचबरोबर लहान-मोठ्या स्वरूपात आळंदी, तळेगाव परिसरात खासगी मध प्रक्रिया केंद्रे उभारली गेली. मात्र, त्यांचा आवश्यक तो फायदा होत नसल्याने त्याचा परिणाम मध उत्पादनावर झाला होता. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे मधाच्या उत्पादनवाढीस मदत होईल, अशी शक्यता मध तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.