Thu, Apr 25, 2019 17:57होमपेज › Pune › मनोरंजनात्मक खेळांनी रंगला सामना ‘पैठणी’चा

मनोरंजनात्मक खेळांनी रंगला सामना ‘पैठणी’चा

Published On: Dec 23 2017 2:31AM | Last Updated: Dec 23 2017 1:30AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

वहिनींनी घेतलेले आगळे-वेगळे ठसकेबाज उखाणे..., आधी तळ्यात मग नंतर मळ्यात मारलेल्या उड्या..., ‘सैराट’च्या झिंगाट गाण्यावर झिंगण्याचा घेतलेला आनंद..., महिलांनी केलेली अवघ्या तीस सेकंदांत आपले वक्तृत्व सादर करण्याची कसरत आणि अखेरच्या संगीत खुर्चीच्या सामन्यात दिलेली लढत..., अशा विविध खेळांनी मनोरंजनात्मकतेचा आस्वाद घेत पैठणीचा सामना रंगला. दैनिक ‘पुढारी’, कात्रज दूध, लक्ष्मी ज्वेलर्स व शेवानी साडीज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्णनगरी, कोंढवा गेट, कोंढवे धावडे येथे ‘खेळ गृहलक्ष्मीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकापेक्षा एक रंगलेल्या या बहारदार स्पर्धेत सहभागी होऊन यशाचे शिखर गाठत तेजस्विनी पाटील यांनी पैठणीचा मान मिळविला.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धक पोळ यांना पैठणी देण्यात आली. या वेळी कात्रज दूध डेअरीचे पांडुरंग कोंढाळकर, गायक अमेय बारटक्के, लक्ष्मी ज्वेलर्सचे किसन वर्मा, अश्‍विनी थोरात, श्रीकृष्णनगरी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रेय मोरे, अनिल धावडे व अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन मेघना झुजम यांनी केले. अखेरपर्यंत रंगलेल्या ‘खेळ गृहलक्ष्मीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. श्रीकृष्णनगरी सोसायटीतील सर्वच महिला या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात खुमासदार उखाणे घेत झाली. एकापेक्षा एक बहारदार उखाण्यांचा रंगमंचावर जणू  पाऊसच पडला. कार्यक्रमाचा पहिला खेळ तळ्यात-मळ्यात हा होता.

यात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. मात्र, अचूक वेळेवर उडी न घेता आल्याने काही महिला बाद झाल्या; तर काहींना पुढील फेरीसाठी निवडण्यात आले. तळ्यात-मळ्यात खेळ चांगलाच रंगला. त्यानंतर दुसर्‍या खेळाला सुरुवात झाली. यात ठरलेल्या नंबरप्रमाणे गाणे संपल्यानंतर महिलांनी जोड्या तयार करायच्या होत्या. याप्रसंगी हा खेळ खेळतानादेखील महिलांचा उत्स्फूर्त उत्साह पाहायला मिळाला. त्यानंतर महिलांनी घागर घुमू दे घुमू दे... या बहारदार गीतावर झिम्मा फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. या वेळी ‘सैराट’ चित्रपटाच्या झिंगाट गाण्यावर झिंगत महिलांनी सभागृहात धम्माल उडवून दिली. तिसरा खेळ मात्र महिलांसाठी मोठ्या कसरतीचा ठरला. यात अवघ्या तीस सेकंदांत दिलेल्या विषयावर बोलून अनेक महिलांनी आपले वक्तृत्व कौशल्य सर्वांसमोर मांडले आणि गुणांची शिडी चढली. त्यानंतर आयोजित अखेरचा संगीत खुर्चीचा सामना जोरदार रंगला. संगीत खुर्चीचा सामना पाहताना सर्वांच्या मनात धस्स झाले होते.

मात्र, आलेल्या सर्व स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाप्रमाणे संगीत खुर्चीमध्येही यश मिळवत पाटील यांनी पहिला क्रमांक पटकविला. मनीषा जगताप यांनी द्वितीय क्रमांक, कोमल वांजळे यांनी तृतीय क्रमांक, आरती कोंढाळकर यांनी चौथा क्रमांक तर पूजा देशमुख यांनी पाचवा क्रमांक पटकावला. या वेळी इतर विजेत्यांना लक्ष्मी ज्वेलर्सच्या वतीने भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन कात्रज डेअरीचे मार्केटिंग अधिकारी कुमार मारणे  यांनी केले.