Tue, Jul 23, 2019 16:41होमपेज › Pune › शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोस मंजुरी

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोस मंजुरी

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:53AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल 23 किलोमीटरच्या मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.  तब्बल 8 हजार 313 कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या 48 महिन्यांत पूर्णत्वास जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी (दि. 2) पत्रकारांना दिली.  ते म्हणाले, हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावर एकूण 23 स्थानके असतील. सार्वजनिक आणि खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि पीएमआरडीए (पुणे महानगर शहर विकास प्राधिकरण) यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नोव्हेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला. तो डिसेंबर 2016 मध्ये पीएमआरडीएच्या सभेत मंजूर करण्यात आला. या प्रकल्पाचा कालावधी 48 महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी 764 प्रवासी प्रवास करू शकतील.

बापट पुढे म्हणाले, की 2021 मध्ये 2 लाख 61 हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 8313 कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार 1 हजार 137 कोटी रुपये देणार आहे, तर राज्याचा वाटा 812 कोटी रुपयांचा असणार आहे. उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी हा प्रगतिपथावर असून पहिल्या टप्प्यातील 31 किलोमीटर मार्गाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. मेट्रोला विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळेल.  50 लाखांहून अधिक पुणेकरांना महामेट्रोचा लाभ मिळणार असून या प्रकल्पाची कामे वेळेपूर्वीच संपविण्याचा आमचा इरादा आहे.