Sun, Jul 21, 2019 16:54
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो अजून अधांतरीच

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो अजून अधांतरीच

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:18AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या  (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पातील प्रस्तावात केंद्र शासनाच्या समितीने आतापर्यंत सात वेळा त्रुटी काढल्या आहेत. जानेवारीमध्ये मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, केंद्राने काढलेल्या त्रुटींमुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास अजून किती काळ लागेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे ‘पीएमआरडीए’चा मेट्रो प्रकल्प अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्द, शहरालगत मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आणि इतर उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. यामुळे हजारो कामगार दररोज ये-जा करतात. या कामगारांना आणि नागरिकांना सार्वजनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हा मेट्रो प्रकल्प पब्लिक प्राव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर राबविला जाणार आहे. मात्र, मेट्रोसाठी केंद्र शासनाकडून सुमारे 1 हजार 300 कोटी रुपये मिळविण्यासाठी ‘पीएमआरडीए’कडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु, केंद्राच्या समितीने त्यात सात वेळा त्रुटी काढल्या आहेत.  

देशात 26 मेट्रो प्रकल्प सुरू झाले असून, त्यातून हे आव्हानात्मक असल्याचे दिसून आलेे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोभोवती 8 हजार कोटींची संपत्ती उभे राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रस्तावित मेट्रो स्टेशन दिल्लीसह देशभरात मेट्रो प्रकल्प कार्यान्वित करताना आलेल्या अडचणींची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी वेळ पुन्हा येऊ नये याची काळजी केंद्र शासनाकडून घेतली जात आहे. तब्बल आठ वर्षांनंतर देशात प्रथमच पीपीपी तत्त्वावरील मेट्रो प्रकल्प सुरू केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात येणार्‍या सर्व अडचणींचे समाधानकारक उत्तरे केंद्राकडून मागितले जात आहेत.