Sun, Jul 21, 2019 09:52होमपेज › Pune › हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उभारणार विनाकर्ज

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उभारणार विनाकर्ज

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:08AMपुणे : प्रतिनिधी

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) करण्यात येणारा हिंजवडी ते शिवाजीनगर हा मेट्रो प्रकल्प बांधा-वापरा हस्तांतरित करा (पीपीपी) या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्यामुळे एकही रुपयाचे कर्ज काढावे लागणार नाही, असे ‘पीएमआरडीए’चे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. पुणे महानगराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य सरकारने ‘पीएमआरडीए’ची स्थापना केली. त्यानुसार ‘पीएमआरडी’ने महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो, पुणे शहराभोवतालचा 129 किलो मिटरचा रिंगरोड, टीपी स्किम आणि परवडणारी घरे यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प 23 किलोमिटर लांबीचा असून त्यामध्ये 23 स्थानके असणार आहेत. मेट्रोच्या कामाचा खर्च आठ हजार कोटी रुपये असून, 40 टक्के निधी केंद्र आणि राज्य सरकार व पीएमआरडीएकडून; तर उर्वरित 60 टक्के निधी खासगी कंपनीच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आपल्या वाट्याचा निधी दिला आहे. हिंजवडी-मेगापोलिस-विप्रो चौक, शिवाजी चौक, वाकड उड्डाण पूल, बालेवाडी स्टेडियम-विद्यापीठ चौक, आकाशवाणी केंद्र, शिवाजीनगर न्यायालय असा मेट्रोचा मार्ग असणार आहे. शिवाजीनगर येथे पुणे महापालिकेच्या मेट्रो प्रकल्पास हा मार्ग जोडण्यात येणार आहे. या कामासाठी तीन कंपन्या पात्र ठरल्या असून, त्यातील एका कंपनीला काम दिले जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या मेट्रोप्रमाणेच भाडे राहतील, असा प्रयत्न पीएमआरडीएचा असणार आहे, असे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले. परंतु, मुबंईतील मेट्रोही पीपपीपी तत्त्वावर बांधली आहे. येथे संबंधित कंपनीने कोणतीच पूर्वकल्पना न देता भाडेेवाढ केली होती. त्यानुसार पुण्यात ही भाडेवाढ होणार नाही, हे कशावरून असा प्रश्‍न पुणेकरांत उपस्थित होत आहे.