Fri, Jul 19, 2019 22:01



होमपेज › Pune › मध्य महाराष्ट्रात 2 दिवसांत उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्रात 2 दिवसांत उष्णतेची लाट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येणार आहे. नगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक येथे कमाल तापमान 38 ते 40 अंशांच्या घरात राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने ऐन मार्चमध्ये येथील नागरिकांना कडक उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. सोमवारी कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रात तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले. कोकण, मुंबईत सरासरी 35 अंश, तर मध्य महाराष्ट्रात सरासरी 36 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदविले गेले.

महत्त्वाच्या शहरांमध्ये मुंबई 25, पुणे 16.5, नगर 16.2, कोल्हापूर 23.9, नाशिक 16.6, सांगली 22.9, सातारा 21.4, सोलापूर 23.3, औरंगाबाद 21.4, नागपूर 19 अंश सेल्सियस किमान तापमान नोंदविले गेले. कोकण, गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, तर उर्वरित भागात सोमवारी लक्षणीय वाढ झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मुंबईकर तापमान वाढीमुळे हैराण

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उन्हाचा तडाखा सुरूच आहे. यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. देशात सर्वात जास्त तापमान मुंबईमध्ये नोंदवले गेले आहे. रविवारी आणि सोमवारीही मुंबईतील सांताक्रूझ येथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईचा पारा कमालीचा वाढला आहे. उष्णतेच्या लाटेमध्ये मुंबईकर चांगलेच होरपळले आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये दुसर्‍यांदा इतक्या उच्च तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वी 2011 साली मुंबईचे तापमान 41.3 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले होते, यानंतर तब्बल सात वर्षांनी या दिवशी 41.0 अंश तापमानाची नोंद झाली. वाढलेले तापमान आणि प्रचंड आर्द्रता यामुळे मुंबईकर सोमवारी हैराण झाले. नागपूरसह महाराष्ट्रात उष्णतेची लाट निर्माण झाली असून सूर्यदेवता सध्या आग ओकत असून तापमानांमुळे नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होत आहे. आज विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 40.7 अंश सेल्सियस  नोंदविले.
 

 

tags : pune,news,heat, wave, in Maharashtra,






  •